कणकवलीच्या विकासाचा संकल्प बॅनरमधून अधोरेखित; कन्हैया पारकर यांच्या फलकाची शहरात चर्चा!

उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार नीलेश राणे यांनी घेतलेल्या शहर विकासाच्या जबाबदारीची आठवण; ‘आपल्या नजरेतील कणकवलीचा विकास प्रत्यक्षात साकार करूया!’ असा बॅनरमधून संदेश

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत शहर विकास आघाडीच्या वतीने उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार नीलेश राणे यांनी प्रचारात सहभाग घेतला होता. यावेळी कणकवली शहराच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी आपण घेत असल्याचे अभिवचन त्यांनी प्रचारसभांमधून दिले होते. आता याच अभिवचनाची आठवण करून देणारा एक लक्षवेधी बॅनर कणकवली शहरात झळकल्याने राजकीय वर्तुळासह नागरिकांमध्ये त्याची विशेष चर्चा रंगू लागली आहे.

कणकवलीचे विद्यमान नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे बंधू तथा माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांच्या वतीने शहरात हा बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनरवर उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार नीलेश राणे आणि कन्हैया पारकर यांची छायाचित्रे झळकत असून, त्यावर ‘साहेब, आपल्या नजरेतील कणकवलीचा विकास प्रत्यक्षात साकार करूया!’ असा आशयपूर्ण मजकूर लिहिण्यात आला आहे. तसेच ‘दिवा उजळू दे विश्वासाचा, प्रकाश पसरू दे विकासाचा!’ या ओळींतून विकासाच्या संकल्पनेला अधोरेखित करण्यात आले आहे.

नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शहर विकास आघाडीच्या माध्यमातून शहराच्या विकासाबाबत जी आश्वासने आणि अभिवचने देण्यात आली होती, त्याच पार्श्वभूमीवर या बॅनरकडे पाहिले जात आहे. प्रचाराच्या व्यासपीठावर व्यक्त झालेला विकासाचा संकल्प आता प्रत्यक्षात उतरावा, शहराच्या विकासाला गती मिळावी आणि कणकवलीचा नियोजनबद्ध विकास व्हावा, असा संदेश या बॅनरमधून देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.

विशेष म्हणजे, बॅनरवरील मजकूर केवळ शुभेच्छा किंवा स्वागतापुरता मर्यादित नसून, निवडणूक प्रचारादरम्यान दिलेल्या विकासाच्या अभिवचनाची आठवण करून देणारा असल्याने त्याकडे नागरिकांचे लक्ष वेधले गेले आहे. त्यामुळे कणकवली शहरातील या बॅनरची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू असून, आता प्रचारसभांमधून दिलेली विकासाची आश्वासने प्रत्यक्षात कधी आणि कशा पद्धतीने साकार होतात, याकडे कणकवलीकरांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!