पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी मासिक सभेत मांडलेल्या प्रश्नाची दखल; सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत झाडांची छाटणी
वैभववाडी (प्रतिनिधी) : फोंडा–वैभववाडी राज्य मार्गावरील खांबाळे-दंड परिसरात रस्त्यावर आडवी आलेली आंबा, वड यांसह मोठी झाडे व त्यांच्या फांद्या अखेर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत छाटण्यात आल्या. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा अडथळा दूर झाला असून वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. खांबाळे-दंड परिसरातून जाणाऱ्या राज्य मार्गावर काही मोठी झाडे रस्त्याच्या दिशेने वाढली होती. त्यातील फांद्या रस्त्यावर आडव्या आल्याने वाहनांच्या ये-जा करण्यास अडथळा निर्माण होत होता. पावसाळ्यात जोरदार वारा व पावसामुळे फांद्या तुटून रस्त्यावर पडण्याचा धोका निर्माण झाला होता.
या समस्येचा मुद्दा पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेत मांडला होता. रस्त्यावर आलेल्या धोकादायक झाडांची व फांद्यांची छाटणी करून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी त्यांनी केली होती. या मागणीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत खांबाळे-दंड परिसरातील रस्त्यावर आडवी आलेली मोठी झाडे व फांद्यांची छाटणी करण्यात आली. त्यामुळे रस्ता मोकळा झाला असून वाहनचालकांना होणारा अडथळा दूर झाला आहे. या कार्यवाहीबद्दल वाहनचालकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.












