बहुकौशल्य प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांनी स्वावलंबी होण्यासाठी लाभ घ्यावा : खासदार अरविंद सावंत

कणकवली (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांनी केवळ पारंपरिक शिक्षणावर अवलंबून न राहता विविध कौशल्ये आत्मसात करून भविष्यात स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने बहुकौशल्य प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन सोबती सोशल फाउंडेशन, मुंबईचे अध्यक्ष तथा खासदार अरविंद सावंत यांनी केले. सोबती सोशल फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने ‘सर्वांगीण विकास उपक्रमांतर्गत प्रायोजित’ साधने व उपकरणांच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन शंकर महादेव गुरुकुल विद्यालय, कुंभवडे येथे करण्यात आले. या विभागाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष तथा खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले.

बहुकौशल्य सहाय्यक प्रशिक्षण (MSAT) उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध साधने व उपकरणांचा प्रत्यक्ष वापर करून कौशल्याधारित प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, कार्यकौशल्य आणि स्वावलंबनाची भावना विकसित होण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भविष्यातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या विविध संधींसाठी आवश्यक असलेली कौशल्ये आत्मसात करता येणार आहेत. शिक्षणासोबतच प्रत्यक्ष कौशल्य प्रशिक्षण मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

कार्यक्रमास संस्थेचे सचिव शशिकांत सावंत, विश्वस्त तथा शालेय समितीचे कार्याध्यक्ष ॲड. राजेंद्र रावराणे, विश्वस्त योगिनी गुरव, सोबती सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद सावंत, यशवंत साटम, शालेय समितीचे उपाध्यक्ष लक्ष्मण सावंत, सावली पांचाळ, गुरुकुल समितीचे सचिव मधुकर सावंत, अजित सावंत, अजित भाट, चेतन तावडे यांच्यासह ग्रामस्थ, मुख्याध्यापिका सौ. अपूर्वा सावंत, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!