बँक अधिकारी असल्याचे भासवून ४.८० लाखांची फसवणूक; डोंबिवलीतून आरोपीला अटक

कणकवली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

कणकवली (प्रतिनिधी) : बँकेने जप्त केलेले वाहन कमी किमतीत मिळवून देतो, असे सांगून फिर्यादीची तब्बल ४ लाख ८० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मागील काही काळापासून पोलिसांच्या हाती न लागलेला आरोपी अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने डोंबिवली, ठाणे येथून ताब्यात घेतला. मंगेश राघोजी बागवे (वय ५२, रा. सुदामवाडी, अर्जुन निवास, दुसरा माळा, डोंबिवली पूर्व, जि. ठाणे; मूळ रा. मसुरे, देऊळवाडी, ता. मालवण) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणी कणकवली पोलिस ठाण्यात गु.र.नं. १७१/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(४) अंतर्गत दिनांक ४ जुलै २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मंगेश बागवे याने आपण बँकेतील अधिकारी असल्याचे फिर्यादीला सांगितले. बँकेने जप्त केलेली वाहने कमी किमतीत उपलब्ध करून देतो, असे आमिष दाखवत त्याने फिर्यादीकडून एकूण ४ लाख ८० हजार रुपये घेतले. मात्र त्यानंतर वाहन न देता तसेच रक्कम परत न करता आर्थिक फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी मंगेश बागवे हा पोलिसांच्या नजरेआड होता. त्याचा शोध घेण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात आले. मात्र तो पोलिसांना मिळून येत नव्हता. वरिष्ठांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांनी आरोपीच्या पार्श्वभूमीबाबत माहिती घेत तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून त्याचा शोध सुरू ठेवला.

तांत्रिक विश्लेषणातून आरोपी डोंबिवली, ठाणे परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई करत १ ऑक्टोबर २०२६ रोजी डोंबिवली येथून मंगेश बागवे याला ताब्यात घेतले. त्यानंतर योग्य त्या तजवीजीनंतर त्याला कणकवली पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या आदेशानुसार तसेच एलसीबी पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत एलसीबी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जामसंडेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर तवटे, किरण देसाई आणि अविनाश ओटवणेकर यांनी सहभाग घेतला.

error: Content is protected !!