फोंडाघाट राधाकृष्ण मंदिरातील अखंड हरिनाम सप्ताहाची शेवटची रात्र मंतरलेली !

टिळा टोपी घालून माळा | म्हणती आम्ही साधू |
दयाधर्म चित्ती नाही | ते जाणावे भोंदू |…श्री संत तुकाराम महाराज.

फोंडाघाट (कुमार नाडकर्णी) : अखंड हरिनाम सप्ताहाच्या शेवटच्या रात्री, बाळ गोपाळ मंडळ फोंडाघाटच्या वतीने, श्रीदेवी माऊली दिंडी पथक, रेड्डी यांनी संत तुकाराम यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित रंगीत संगीत रथ सादर केला. शेवटची रात्र, ढोल ताशांचा दणदणाट आणि रंगीबेरंगी फटाक्याची आतषबाजी यामुळे फोंडाघाट बाजारपेठ रात्रभर गजबजलेली होती. राधाकृष्णाचा आणि मोरयाss चा जयघोषावर आणि भगव्या ध्वज पताका सह युवाईने फेर धरला. आणि यामध्ये संत तुकाराम यांच्या जीवनपटाने भाविकांना मंत्रमुग्ध केले. याकरिता श्रीदेवी माऊली पथक रेड्डी यांच्या कौशल्यपूर्ण देखाव्याचे आणि बाल गोपाळ मंडळाचे सर्वांनी कौतुक केले …

संत तुकाराम यांची श्रीपांडुरंगा प्रती नि:स्वार्थी भक्ती, त्यांचे संघर्षमय जीवन आणि बायको आवली कडून पांडुरंगाचा राग आणि प्रत्येक वेळी त्याला मिळालेली विठ्ठलाची साथ याचे यथार्थ दर्शन आपल्या देखाव्या मधून पथकाने सादर केले. या देखाव्यामध्ये स्वप्निल कामत (तुकाराम), संगीता कनयाळकर (आवली), वैभवी कनयाळकर (विठ्ठल), मुकेश परब (महादबा), रघुनाथ सावळ (रामा) यांनी आपल्या बहारदार अभिनयाने भाविक, रसिकांचे कौतुक मिळविले. ट्रिक्ससीन लाही सर्वांनी उत्स्फूर्त दाद दिली..

फोंडाघाट- गांगोवाडी गोविंदा पथकाची सलामी

जिल्ह्यात लोकप्रिय आणि नामवंत फोंडाघाट गांगोवाडी गोविंदा पथकाने राधाकृष्ण मंदिरासमोर, सहा थर लावून कान्हाला मानवंदना दिली.त्यावेळी उपस्थिततांनी मोरया ss च्या जयघोषात पथकातील गोविंदांना प्रोत्साहन दिले. सगळ्यांना कान्हा च्या दही, दूध, लोणी गोपालासवे चोरून खाण्याच्या नटखट लिले ची आठवण झाली. यावेळी या पथकाने धाडसी खेळाला दिलेले बक्षीस सुद्धा पथक व्यवस्थापकाने मंदिराला देणगी दाखल देऊन, खेळियाच्या प्रांगणात धाडसी प्रदर्शन करण्याची संधी दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले. श्रीदेव राधाकृष्ण वैश्य समाज व बालगोपाळ मंडळांनी राधाकृष्णची प्रतिमा, श्रीफळ, पुष्प देऊन पथकाचा गौरव केला..

error: Content is protected !!