सायबर सेलच्या धनश्री भोसले यांचे आवाहन; फसवणुकीतील पैसे परत मिळविण्यासाठी स्वतंत्र ऑनलाइन यंत्रणा
ओरोस (प्रतिनिधी) : ‘तुमच्या आधार कार्डचा किंवा मोबाईल क्रमांकाचा गुन्ह्यासाठी वापर झाला आहे’, ‘तुमच्याविरोधात अटक वॉरंट निघाले आहे’, अशा धमक्या देऊन नागरिकांना ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली लाखो रुपयांचा गंडा घालण्याचे प्रकार घडत आहेत. मात्र, ‘डिजिटल अरेस्ट’ नावाची कोणतीही कायदेशीर प्रक्रिया अस्तित्वात नाही. त्यामुळे अशा धमक्यांना नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सायबर फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या हेल्पलाइनवर किंवा राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवर तक्रार करावी. सायबर फसवणुकीत गमावलेले पैसे परत मिळविण्यासाठी आता स्वतंत्र ऑनलाइन सुविधाही उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहिती जिल्हा सायबर सेलच्या धनश्री भोसले यांनी दिली.
भोसले म्हणाल्या, की सायबर गुन्हेगार नागरिकांना व्हॉट्सॲपवर बनावट अटक वॉरंट पाठवतात. काही वेळा थेट व्हिडिओ कॉल करून आपण मुंबई क्राईम ब्रँच किंवा सीबीआयचे अधिकारी असल्याचे भासवतात. पोलिसांचा गणवेश परिधान करून नागरिकांचा विश्वास संपादन करण्याचाही प्रयत्न केला जातो. तुमच्या आधार कार्डचा गैरवापर झाला आहे, तुमच्या मोबाईल क्रमांकावरून बेकायदा संदेश पाठविले जात आहेत किंवा तुमचे नाव एखाद्या गंभीर गुन्ह्यात आले आहे, असे सांगून भीती निर्माण केली जाते. त्यानंतर गुन्ह्यातून सुटका करून देण्यासाठी किंवा अटकेची कारवाई टाळण्यासाठी पैशांची मागणी केली जाते. हा संपूर्ण प्रकार फसवणुकीचा असून नागरिकांनी अशा कॉलना प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन धनश्री भोसले यांनी केले आहे.
सायबर फसवणूक झाल्यानंतर तक्रार करण्यास विलंब होणे धोकादायक ठरते. फसवणूक करणारे पैसे मिळताच ते विविध बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करतात. त्यामुळे पैसे परत मिळविण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची बनते. फसवणुकीची माहिती मिळताच नागरिकांनी www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी किंवा १९३० या राष्ट्रीय हेल्पलाइनशी संपर्क साधावा. हेल्पलाइन व्यस्त असल्यास ऑनलाइन पोर्टलचा वापर करावा. तक्रार जितक्या लवकर दाखल होईल, तितक्या लवकर संबंधित रक्कम रोखण्यासाठी प्रयत्न करता येतात, असे भोसले यांनी स्पष्ट केले.
पैसे परत मिळविण्यासाठी नवी सुविधा
सायबर फसवणुकीत गमावलेले पैसे परत मिळविण्यासाठी ‘मनी रिस्टोरेशन मॉड्यूल’ (एमआरएम) ही स्वतंत्र ऑनलाइन सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. सायबर गुन्ह्याची तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित बँक खात्यांमधील फसवणुकीची रक्कम रोखण्यात आल्यास त्याची माहिती या यंत्रणेत नोंदविली जाते. बँकेकडून आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित तक्रारदाराला संदेश पाठविला जातो. त्यानंतर तक्रारदाराला ऑनलाइन पद्धतीने आवश्यक माहिती भरून पैसे परत मिळविण्यासाठी पुढील प्रक्रिया करता येते. पूर्वी यासाठी पोलिस ठाण्याच्या स्तरावरून तक्रारदारांशी संपर्क साधावा लागत होता. तसेच कोर्टात जावे लागत होते. आता या नवीन सुविधेमुळे प्रक्रिया अधिक सुलभ होण्यास मदत होणार असल्याचे भोसले यांनी सांगितले.
बँक खाते गोठल्यासही तक्रार निवारण
सायबर गुन्ह्यांतील पैशांचे व्यवहार अनेक बँक खात्यांमधून होत असल्याने काही वेळा फसवणुकीशी थेट संबंध नसलेल्या व्यक्तींची बँक खातीही गोठविली जातात. हॉटेल व्यावसायिक, व्यापारी किंवा इतर नागरिकांच्या खात्यांमध्ये अनवधानाने संशयास्पद व्यवहारांतील रक्कम जमा झाल्यास त्यांनाही अडचणींचा सामना करावा लागतो. अशा प्रकरणांत ‘ग्रीव्हन्स रिड्रेसल मॉड्यूल’ (जीआरएम) ही तक्रार निवारण सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. संबंधित खातेदारांनी आपल्या बँकेच्या शाखेत जाऊन व्यवस्थापकाशी संपर्क साधावा. बँकेमार्फत या पोर्टलवर खाते गोठविण्यासंदर्भातील तक्रार निवारणाची विनंती नोंदविता येते. त्यानंतर संबंधित पोलिस यंत्रणेकडून प्रकरणाची पडताळणी करून पुढील कार्यवाही केली जाते. त्यामुळे कोणताही गुन्हा केलेला नसताना बँक खाते गोठविले गेल्यास नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भोसले यांनी केले.
शाळा-महाविद्यालयांत जनजागृती
सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिस दलाच्या सायबर सेलमार्फत शाळा, महाविद्यालये तसेच विविध आस्थापनांमध्ये जनजागृती कार्यक्रम घेतले जात आहेत. डिजिटल अरेस्ट, बनावट बँक अधिकारी, ओटीपी मागणे, बँक खात्याची गोपनीय माहिती मिळविणे अशा फसवणुकीच्या पद्धतींबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.सायबर गुन्हेगार प्रामुख्याने नागरिकांच्या मनात भीती निर्माण करून त्यांना तातडीने पैसे पाठविण्यास भाग पाडतात. त्यामुळे कोणत्याही अनोळखी व्यक्तीला ओटीपी, बँक खात्याचा तपशील किंवा इतर गोपनीय माहिती देऊ नये. पोलिस किंवा तपास यंत्रणेचे अधिकारी असल्याचे सांगून कोणी पैशांची मागणी केल्यास त्याला बळी पडू नये. नागरिकांनी घाबरून न जाता तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन धनश्री भोसले यांनी केले.
फसवणूक झाल्यास तातडीने तक्रार करा!
१९३० : राष्ट्रीय सायबर आर्थिक फसवणूक हेल्पलाइन.
www.cybercrime.gov.in : ऑनलाइन सायबर गुन्ह्यांची तक्रार नोंदविण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ.
डिजिटल अरेस्टच्या नावाने येणाऱ्या धमक्या, बनावट वॉरंट आणि व्हिडिओ कॉलकडे दुर्लक्ष करा.
ओटीपी, बँक खात्याचे तपशील, पासवर्ड आणि गोपनीय माहिती कोणालाही देऊ नका.
फसवणुकीतील पैसे परत मिळविण्यासाठी ‘मनी रिस्टोरेशन मॉड्यूल’ आणि गोठविलेल्या बँक खात्यांबाबत तक्रार निवारणासाठी ‘ग्रीव्हन्स रिड्रेसल मॉड्यूल’ या सुविधांचा उपयोग करा.












