ज्येष्ठ रंगकर्मी सुहास वरुणकर यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराजनगर येथील रहिवासी, राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागातील निवृत्त कर्मचारी, ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्यदिग्दर्शक, अभिनेते सुहास वासुदेव वरुणकर (वय 64) यांचे रविवारी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगी जावई असा परिवार आहे.

सुहास वरुणकर यांनी अक्षरसिंधू साहित्य कला मंचच्या माध्यमातून अनेक नाट्यकृती मधून अभिनय केला, दिग्दर्शन केले, अनेक पुरस्कार प्राप्त केले. राज्य परिवहन महामंडळाच्या नाट्य स्पर्धेत त्यांनी सिंधुदुर्ग विभागाला अनेक पारितोषिकेही प्राप्त करून दिली त्यांनी अनेक कलावंत घडविले.

रविवारी सायंकाळी त्यांना घरामध्येच अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि खाली कोसळले. त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांची प्राणज्योत मावळली. रुग्णालयात शहरवासीयांनी मोठी गर्दी केली होती.

error: Content is protected !!