चौघड्यावरच्या गणपती बाप्पाचे अप्रतिम पेन्सिल स्केच..!

चिंदरच्या अथर्व तावडेच्या कलागुणांचे इनामदार श्री रामेश्वर देवस्थान समिती आचरा कडून कौतुक

आचरा (प्रतिनिधी) : इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान आचराच्या वतीने श्री देव रामेश्वर मंदिरात सुरू असलेल्या ४१ दिवसांच्या गणेशोत्सवानिमित्त चिंदर गावठणवाडी येथील कु. अथर्व गणेश तावडे याने मंदिरातील चौघड्यावरच्या गणपती बाप्पाचे अप्रतिम पेन्सिल स्केच साकारले आहे.

अथर्वने साकारलेले हे पेन्सिल स्केच इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी संस्थानचे वहिवाटदार महादेव मिराशी, देवस्थानचे सचिव संतोष मिराशी आणि पत्रकार परेश सावंत उपस्थित होते. याप्रसंगी देवस्थानच्या वतीने अथर्वचा सत्कार करून त्याच्या कलागुणांचे कौतुक करण्यात आले.

कु. अथर्व तावडे हा ज्युनिअर कॉलेज, आचरा येथे बारावी इयत्तेत शिक्षण घेत असून त्याला चित्रकलेची विशेष आवड आहे. आपल्या कलेच्या माध्यमातून त्याने गणपती बाप्पाचे साकारलेले हे पेन्सिल स्केच भक्ती आणि कलेचा सुरेख संगम ठरले आहे.

विशेष म्हणजे, अंमली पदार्थविरोधी जनजागृती भित्तिपत्रक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल काही दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्या हस्ते अथर्वचा सत्कार करण्यात आला होता. अथर्वच्या या कलाकृतीचे परिसरातून कौतुक होत आहे.

error: Content is protected !!