मोफत टी.बी तपासणीसह रक्तदान शिबिराचे चिंदर ग्रामपंचायत व आयुष्यमान आरोग्य मंदिर चिंदर यांच्या वतीने आयोजन
आचरा (प्रतिनिधी) : आयुष्मान आरोग्य मंदिर, चिंदर यांच्या वतीने ‘माझा गाव आरोग्य संपन्न गाव अभियान’ आणि ‘टीबी मुक्त भारत अभियान’ अंतर्गत मंगळवार, १३ ऑक्टोबर २०२६ रोजी चिंदर आरोग्य उपकेंद्र येथे मोफत छातीचा एक्स-रे तपासणी कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. याच दिवशी ‘सेवा संकल्प सेतू’ अभियानांतर्गत ग्रामपंचायत चिंदर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य तपासणी आणि रक्तदान या दोन महत्त्वपूर्ण उपक्रमांतून आरोग्य जनजागृतीसोबतच सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला जाणार आहे.
क्षयरोगाचे लवकर निदान होऊन रुग्णांना वेळेत योग्य उपचार मिळावेत, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरात नागरिकांची मोफत छातीचा एक्स-रे तपासणी करण्यात येणार आहे. याशिवाय रक्तदाब, रक्तातील साखर आदींची तपासणी केली जाणार आहे. तसेच आभा कार्ड (आयुष्मान भारत डिजिटल हेल्थ आयडी), आयुष्मान कार्ड आणि वय वंदना कार्ड यांसारख्या आरोग्यविषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
दरम्यान, ‘सेवा संकल्प सेतू’ अभियानांतर्गत मंगळवार, १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत ग्रामपंचायत चिंदर येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. आयुष्मान आरोग्य मंदिर, चिंदर हे या शिबिराचे प्रमुख आयोजक असून, ग्रामपंचायत चिंदर आणि ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांचे सहकार्य लाभणार आहे.
रक्तदान हे श्रेष्ठ दान असून, गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि समाजात रक्तदानाविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक रक्तदात्यांनी शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
एकाच दिवशी आरोग्य तपासणी आणि रक्तदान अशा दोन महत्त्वपूर्ण उपक्रमांचे आयोजन करून चिंदर परिसरात आरोग्यविषयक जनजागृतीला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तरी गावातील नागरिकांनी या उपक्रमांत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासोबतच सामाजिक कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.













