महाविद्यालयीन विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : International Association for Children Development (IACD) तर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांचे शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, बालहक्क, बालसंरक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी आणि अनुभवी ज्येष्ठ नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन संस्थेने केले आहे.
मुलांच्या विकासासाठी समाजातील तरुणांची ऊर्जा आणि ज्येष्ठ नागरिकांचा अनुभव यांचा योग्य समन्वय साधण्याचा IACD चा प्रयत्न आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्वयंसेवक म्हणून विद्यार्थ्यांशी संवाद साधणे, शैक्षणिक व व्यक्तिमत्त्व विकास उपक्रमांना सहकार्य करणे, कार्यशाळा, खेळ व गटचर्चांच्या आयोजनात मदत करणे तसेच बालसुरक्षा आणि गोपनीयतेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून जबाबदारीने काम करण्याची संधी मिळणार आहे.
स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्यासाठी पूर्वानुभवाची आवश्यकता नसून, मुलांसाठी काम करण्याची इच्छा, सकारात्मक दृष्टिकोन, वेळ देण्याची तयारी आणि नवीन गोष्टी शिकण्याची जिद्द महत्त्वाची असल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन नोव्हेंबर २०२६ मध्ये करण्यात येणार आहे. शिबिरासाठी २७,२८ किंवा २९नोव्हेंबर यांपैकी एक दिवस निश्चित करण्यात येईल. यामध्ये IACD चे कार्य, स्वयंसेवकांची भूमिका, मुलांशी संवेदनशील संवाद, बालसुरक्षा तसेच शैक्षणिक आणि विकासात्मक उपक्रमांच्या प्रभावी आयोजनाबाबत मार्गदर्शन केले जाईल.
त्याचबरोबर सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी, अनुभवी शिक्षक, उद्योजक, व्यावसायिक आणि समाजसेवेची आवड असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्धदिवसीय विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांनी आयुष्यभर मिळवलेले ज्ञान, कौशल्ये, जीवनानुभव आणि संस्कार पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी या उपक्रमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे.
ज्येष्ठ नागरिक मुलांना शिक्षण, करिअर, शिस्त, आत्मविश्वास, निर्णयक्षमता, मेहनत आणि जीवनमूल्यांबाबत मार्गदर्शन करू शकतील. तसेच ते IACD च्या विविध उपक्रमांमध्ये मार्गदर्शक म्हणून सहभागी होऊन नवीन कल्पना आणि उपक्रम सुचवू शकतील.
“तरुणांचा उत्साह आणि ज्येष्ठांचा अनुभव यांची सांगड घालून सिंधुदुर्गातील मुलांसाठी सक्षम, संवेदनशील आणि प्रेरणादायी आधारव्यवस्था निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीचा थोडासा वेळही एखाद्या मुलाच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकतो,” असे IACD तर्फे सांगण्यात आले.
या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी आपली नोंदणी करावी, असे आवाहन IACD चे अध्यक्ष डॉ.उमेशचंद्र सावंत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९४२०८२२२३०,९८६०००१४१६ वर संपर्क साधावा.












