वनराई बंधाऱ्यांसाठी २५ हजार पिशव्या

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा पुढाकार; अध्यक्ष मनीष दळवी यांनी जिल्हा परिषदेकडे केल्या सुपूर्द

ओरोस (प्रतिनिधी) : संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सुरू असलेल्या जलसंधारणाच्या मोहिमेला सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मदतीचा हात दिला आहे. जिल्हाभरात लोकसहभागातून उभारण्यात येणाऱ्या वनराई बंधाऱ्यांसाठी बँकेने तब्बल २५ हजार पिशव्या उपलब्ध करून दिल्या आहेत. बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी आज या पिशव्या जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्याकडे सुपूर्द केल्या. त्यामुळे जिल्ह्यातील वनराई बंधाऱ्यांच्या कामाला आणखी गती मिळणार आहे.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश बोडस, प्रकाश मोर्ये, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई आदी उपस्थित होते.यंदा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने आगामी काळात पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने आतापासूनच जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य दिले आहे. जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावागावांत वनराई बंधारे उभारण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पिशव्यांची आवश्यकता आहे. ही गरज ओळखून जिल्हा बँकेने सामाजिक बांधिलकीतून २५ हजार पिशव्या उपलब्ध करून दिल्या आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्याची भौगोलिक रचना डोंगराळ असल्याने पावसाचे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते. हे पाणी अडवून जमिनीत जिरवण्यासाठी वनराई बंधारे उपयुक्त ठरतात. नाले, ओढ्यांमध्ये वाळू अथवा माती भरलेल्या पिशव्या रचून कमी खर्चात हे बंधारे उभारता येतात. त्यासाठी ग्रामस्थांच्या श्रमदानाचीही मदत होते. या बंधाऱ्यांमुळे पाणी अडविण्यासह परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होते. तसेच शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढू शकते. जिल्ह्यात प्रत्येक गावात पाच ते दहा बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी म्हणाले, ‘‘जिल्हा बँक ही केवळ आर्थिक व्यवहार करणारी संस्था नसून शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणारी संस्था आहे. पाणी हाच शेतकऱ्यांच्या समृद्धीचा खरा पाया आहे. जिल्ह्यातील जलसंधारणाची मोहीम ही लोकचळवळ बनत आहे. या लोकचळवळीत जिल्हा बँकेला योगदान देता येत आहे, ही अभिमानाची बाब आहे. जिल्ह्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी बँक यापुढेही विकासात्मक उपक्रमांत अग्रेसर राहील.’’

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी बँकेच्या या पुढाकाराचे स्वागत केले. ते म्हणाले, ‘‘संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांना गती दिली जात आहे. त्यासाठी लोकसहभागाबरोबरच विविध संस्थांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. जिल्हा बँकेने उपलब्ध करून दिलेल्या २५ हजार पिशव्यांमुळे या मोहिमेला बळ मिळाले आहे. या पिशव्यांचे सर्व तालुक्यांमध्ये गरजेनुसार वितरण करण्यात येईल.’’

जलसंधारणाला सहकार्याचा हात
जिल्ह्यात वनराई बंधाऱ्यांची कामे लोकसहभागातून सुरू असताना त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची उपलब्धता महत्त्वाची ठरत आहे. जिल्हा बँकेने एकाचवेळी २५ हजार पिशव्या उपलब्ध करून दिल्याने गावागावांतील बंधाऱ्यांच्या उभारणीला मदत होणार आहे. पाण्याच्या प्रश्नावर मात करण्यासाठी सहकारी संस्थाही पुढे येत असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले आहे.

error: Content is protected !!