जनता विद्या मंदिर त्रिंबक प्रशालेची कॅरममध्ये बाजी..!

सात विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड; प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत जनता विद्या मंदिर त्रिंबक प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत प्रशालेच्या तब्बल सात विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

दिनांक ९ व १० ऑक्टोबर २०२६ रोजी कट्टा इंग्लिश मीडियम स्कूल, कट्टा येथे मालवण तालुकास्तरीय कॅरम स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत जनता विद्या मंदिर त्रिंबक प्रशालेच्या १४ वर्षांखालील मुले व मुली गटातून कुमार मयूर परब, कुमारी कस्तुरी बांदिवडेकर, कुमारी मोहिनी साटम आणि कुमारी प्रांजल मुळये या चार विद्यार्थ्यांची, तर १७ वर्षांखालील मुली गटातून कुमारी शमिका पवार, कुमारी रेवा पाटील आणि कुमारी अनन्या त्रिंबककर या तीन विद्यार्थिनींची जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली.

या सात ही विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र उर्फ अन्ना सकपाळ, उपाध्यक्ष अशोक बागवे, सचिव अरविंद घाडी, सर्व संचालक मंडळ, प्रशालेचे मुख्याध्यापक प्रवीण घाडीगावकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी अभिनंदन केले. तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

या विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रीडा शिक्षक महेंद्र वारंग सर यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे प्रशालेच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

error: Content is protected !!