वनराई बंधाऱ्यांची पाहणी करत जि.प. उपाध्यक्ष दादा साईल यांनी घेतला पंचनाम्यांचा आढावा

पावशी जि.प. मतदारसंघातील पाहणी दौऱ्याला बांबुळी, बाव व सोनवडे येथून प्रारंभ

जलसंधारणाच्या कामांना गती देण्यावर भर

कुडाळ (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात, करण्यासाठी तसेच जलसंधारणाच्या कामांना गती देण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी पावशी जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व वाडी वस्त्यांवर जाऊन भातशेती नुकसानीच्या पंचयादी आणि वनराई आणि कच्चे बंधारे पाहणी दौऱ्याला आज बांबुळी येथून प्रारंभ केला. यानिमित्ताने त्यांनी बांबुळी, बाव व सोनवडे येथे भेट देऊन झालेल्या पंचनाम्यांचा आढावा घेतला. यावेळी वनराई बंधाऱ्यांची पाहणी करून नवीन बंधाऱ्यांच्या बांधणी संदर्भातही आढावा घेण्यात आला. यावेळी त्यांनी बांबुळी, बाव आणि सोनवडे येथे प्रत्यक्ष बंधारा बांधकाम करत श्रमदानात सहभाग घेतला..

शेतीच्या नुकसानीसंदर्भात करण्यात आलेल्या पंचनाम्यांची माहिती घेत स्थानिक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच परिसरातील अस्तित्वात असलेल्या वनराई बंधाऱ्यांची पाहणी करून जलसंधारणाच्या कामांची स्थिती जाणून घेण्यात आली. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरवण्यासाठी नवीन वनराई बंधाऱ्यांची बांधणी करणे आवश्यक असल्याने या कामांवर भर देण्यात आला.

पाणीटंचाईच्या संभाव्य परिस्थितीचा विचार करून जलस्रोतांचे बळकटीकरण, पाण्याची उपलब्धता वाढवणे आणि जलसंधारणाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबवणे गरजेचे आहे. त्यासाठी वनराई बंधाऱ्यांच्या माध्यमातून पाणी अडवणे व जमिनीत जिरवण्याच्या कामांना प्राधान्य देण्यावर यावेळी भर देण्यात आला. यावेळी त्यांनी उपस्थित शालेय विध्यार्थ्यांशी सवांद साधत त्यांना जलसंधारणा बरोबर जल बचतीचा संदेश घरा घरात पोचविण्यासाठी आवाहन केले.

यावेळी शिवसेना विभाग प्रमुख नागेश परब, बांबुळी सरपंच बबलू परब, विस्तार अधिकारी महादेव खरात, बाव सरपंच बाबू आसोलकर, सोनवडे सरपंच नाजूका धुरी, सुधीर धुरी, समीर धुरी, सिद्धेश परब, संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, कृषी सहायक, तलाठी, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, महिला बचत गटांच्या सदस्य, मुख्याध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!