सावली जनसेवा शिक्षण संस्था व ग्रामपंचायतीचा संयुक्त उपक्रम
वरवडे (प्रतिनिधी) : सावली जनसेवा शिक्षण संस्था, वरवडे आणि वरवडे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मागासवर्गीय समाजबांधवांसाठी मोफत हृदयरोग तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ३५ जणांची मोफत आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधोपचारही विनामूल्य करण्यात आले.
समाजातील गरजू नागरिकांना आरोग्यसेवा सहज उपलब्ध व्हावी आणि हृदयरोगासारख्या गंभीर आजारांबाबत जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला ग्रामस्थांचा प्रतिसाद लाभला.
यावेळी वरवडेच्या सरपंच करुणा घाडीगावकर, सावली संस्थेचे अध्यक्ष प्रसाद देसाई, उपाध्यक्ष संतोष ऊर्फ पप्पू पुजारे, ग्रामसेवक चव्हाण मॅडम, ग्रामपंचायत सदस्य विशाल कासले, डॉ. संकेत पोकळे, सायली कासले, सागर जाधव, सिद्धार्थ कदम, सुरेश जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी जपत गरजू समाजबांधवांसाठी आरोग्यविषयक उपक्रम राबविल्याबद्दल या संयुक्त उपक्रमाचे कौतुक होत आहे.












