३२ शाळांतील ६०० खेळाडूंचा सहभाग; क्रीडा शिक्षक सुभाष सावंत यांचा विशेष सन्मान
मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा मंगळवार, दि. १३ आणि बुधवार, दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय, शिरवंडे येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाल्या. या स्पर्धेत मालवण तालुक्यातील ३२ शाळांमधील सुमारे ६०० खेळाडूंनी सहभाग घेतला. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धांमुळे शिरवंडे येथे क्रीडामय वातावरण निर्माण झाले होते.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष दशरथ घाडीगांवकर, चंद्रकांत गावकर, प्रवीण घाडीगांवकर, सुहास चव्हाण, सुरेश गावकर, पंचायत समिती सदस्य दीपक चव्हाण, प्रशालेचे मुख्याध्यापक तर्फे सर, क्रीडा समन्वयक संजय पेंडुरकर, मुख्याध्यापक सुशांत पाटील, अविनाश परब, दिनेश सावंत, लक्ष्मण शिंदे यांच्यासह तालुक्यातील क्रीडा शिक्षक, मार्गदर्शक आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
क्रीडा शिक्षक सुभाष सावंत यांचा गौरव
या स्पर्धेचे औचित्य साधून त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय, शिरवंडे येथील क्रीडा शिक्षक सुभाष सावंत यांचा मालवण तालुका क्रीडा शिक्षकांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. आपल्या २५ वर्षांच्या शैक्षणिक कारकिर्दीत त्यांनी अनेक राज्यस्तरीय खेळाडू घडविले असून, क्रीडा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या सन्मान सोहळ्यावेळी क्रीडा शिक्षक महेंद्र वारंग, शैलेश मुळीक, संदीप कोळापटे, संतोष गोसावी, वसावे सर, अनिल आचरेकर, संदीप गोळवणकर, हडलगेकर सर, कुंभार सर, देसाई सर, संतोष तावडे, निलेश राठोड, रविकांत घेवडे, पंकज राणे यांच्यासह तालुक्यातील अनेक क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
पोलिसांसह क्रीडा अधिकाऱ्यांची स्पर्धेला भेट
आचरा पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक देसाई मॅडम, पोलीस कॉन्स्टेबल मनोज पुजारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्पर्धास्थळी भेट देऊन सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी जिल्हा क्रीडा अधिकारी मार्क धरमाई आणि तालुका क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांनी स्पर्धास्थळी भेट दिली. त्यांनी खेळाडूंचे कौतुक करून त्यांना पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
आयोजकांकडून खेळाडूंसाठी उत्तम व्यवस्था
स्पर्धेच्या दोन्ही दिवशी उपस्थित सुमारे ६०० खेळाडूंसाठी चहा व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच उपस्थित क्रीडा शिक्षक, मार्गदर्शक आणि इतर मान्यवरांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालयाचे संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ आणि पालक यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली.
या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना आपले क्रीडागुण दाखविण्याची संधी मिळाली. तसेच क्रीडा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांमध्ये खिलाडूवृत्ती, शिस्त आणि सांघिक भावनेला प्रोत्साहन मिळाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कानेकर सर यांनी केले.












