धम्मक्रांतीचे प्रतिबिंब आचरणातून उमटले पाहिजे : प्रा. प्रशांत हटकर

वैभववाडी (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन सामाजिक परिवर्तनाची ऐतिहासिक धम्मक्रांती घडवून आणली. या ऐतिहासिक घटनेच्या ७० वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेताना बाबासाहेबांनी दिलेल्या विचारांचे प्रतिबिंब आपल्या आचरणातून उमटणे आवश्यक आहे. धम्मक्रांती केवळ विचारांपुरती मर्यादित न राहता ती प्रत्यक्ष कृतीतून दिसली पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. प्रशांत हटकर यांनी केले.
  
वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ आणि माता रमाई महिला मंडळ, वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन, वैभववाडी येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक्रांती : काल, आज आणि उद्या’ या विषयावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. हटकर बोलत होते.

यावेळी संघाचे अध्यक्ष भास्कर जाधव, सरचिटणीस रवींद्र पवार, मुंबई उपाध्यक्ष संदीप कदम, संतोष कदम, महिला मंडळाच्या अध्यक्षा शारदा कांबळे, कार्याध्यक्षा मोहिनी कांबळे, स्मिता पवार, सुवर्णा यादव यांच्यासह विविध पदाधिकारी आणि समाजबांधव उपस्थित होते.
  
प्रा. हटकर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा देताना दिलेल्या २२ प्रतिज्ञा समाजपरिवर्तनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या प्रतिज्ञांचे महत्त्व समजून घेऊन प्रत्येकाने त्यांचे आचरण केले पाहिजे. बुद्धविहार हे केवळ धार्मिक विधी आणि पूजापाठाचे केंद्र न राहता ज्ञान, शिक्षण आणि समाजप्रबोधनाचे केंद्र बनले पाहिजे. बुद्धविहाराच्या माध्यमातून समाजाचे शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. समाजप्रबोधनाच्या कार्यात महिला आणि युवकांचा सहभाग वाढविणे ही काळाची गरज आहे.
  
आजच्या डिजिटल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात समाजाने मागे राहून चालणार नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी आणि नव्या संधींचा लाभ घेण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने प्रयत्नशील राहिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
  
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि धम्मध्वजारोहणाने करण्यात आली. बौद्ध उपासक महेंद्र यादव, सुरेंद्र यादव, संतोष कदम, अभय कांबळे आणि मंगेश कांबळे यांनी बुद्धपूजा व धार्मिक विधींचे संचालन केले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
  
कार्यक्रमात तालुक्यातील शिष्यवृत्ती परीक्षा, दहावी, बारावी आणि पदवी परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा संघाच्या वतीने गौरव करण्यात आला. तसेच संघाचे कार्यकर्ते भगवान जाधव (सांगूळवाडी) आणि पंचायत समिती वैभववाडी येथून वाहनचालक पदावरून सेवानिवृत्त झालेले अंकुश जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
  
यावेळी अजित कदम, संजय जंगम, रमेश बावडेकर, रूपेश कांबळे, अर्जुन कदम, विकास जाधव, स्नेहशिष कदम, प्रमोद जाधव, चंद्रकांत जाधव, कृष्णा कांबळे, प्रीतम जाधव, सुहास जाधव, नितीन कांबळे, अनंत जाधव, राजाराम जाधव, अजित तांबे, संतोष यादव, आकाराम कांबळे, मोहन जंगम आदी उपस्थित होते.
  
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र पवार यांनी केले. सूत्रसंचालन शरद कांबळे यांनी केले, तर मारुती कांबळे यांनी आभार मानले.

error: Content is protected !!