वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचा स्तुत्य उपक्रम; दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी संसाधन कक्षाची स्थापना

संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या उपस्थितीत संचालक विजय रावराणे यांच्या हस्ते कक्षाचे उद्घाटन संपन्न

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका शिक्षण संस्था आणि गटसाधन केंद्र, पंचायत समिती वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय दिव्यांग विद्यार्थी संसाधन कक्षाची स्थापना करण्यात आली. संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या उपस्थितीत संचालक विजय रावराणे यांच्या हस्ते या कक्षाचे उद्घाटन संपन्न झाले. या कक्षाच्या माध्यमातून प्रशालेसह वैभववाडी तालुक्यातील विविध गावांमधील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांच्या शैक्षणिक गरजांची पूर्तता करणे तसेच अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक सुलभ करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या संसाधन कक्षामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक विकासासाठी आवश्यक सहकार्य मिळणार असून, त्यांच्या सर्वांगीण प्रगतीला चालना मिळणार आहे. उपस्थित दिव्यांग विद्यार्थ्याना विशेष लेखन पाटी चे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. तरी वैभववाडी तालुका पंचक्रोशीतील दिव्यांग विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी याप्रसंगी केले आहे.

याप्रसंगी मुख्याध्यापक भास्कर नादकर, केंद्र प्रमुख रामचंद्र जाधव, संतोष गोसावी व विशेष शिक्षक महेश प्रभावळकर तसेच प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व दिव्यांग विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!