वैभववाडीत नारायण सुर्वे यांच्या कवितांचे काव्यवाचन; विद्यार्थ्यांना साहित्यिक विचारांची प्रेरणा

वैभववाडी (प्रतिनिधी) : पद्मश्री कवी नारायण सुर्वे यांच्या कवितांमधून श्रमिकांचे जीवन, सामाजिक वास्तव, मानवी संवेदना आणि संघर्षशील विचारांचे दर्शन घडते. त्यांच्या साहित्यिक विचारांतून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाची वाटचाल करावी, असे प्रतिपादन प्रमुख वक्त्या डॉ. दर्शना कोलते यांनी केले.
   
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था, मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पद्मश्री कवी नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित काव्यवाचन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. आर. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

नारायण सुर्वे यांच्या साहित्याचा घेतला आढावा
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या डॉ. दर्शना कोलते यांनी नारायण सुर्वे यांच्या जीवनकार्याचा, साहित्यिक योगदानाचा आणि परिवर्तनवादी विचारांचा आढावा घेतला. सुर्वे यांच्या कवितांमध्ये सामान्य माणसाचे जीवन, श्रमिकांचे प्रश्न, सामाजिक विषमता आणि संघर्षातून उभे राहणाऱ्या माणसाचे सामर्थ्य प्रभावीपणे व्यक्त झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या साहित्याचा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीव विकसित करावी आणि त्यांच्या विचारांतून प्रेरणा घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

विद्यार्थ्यांनी केले कवितांचे प्रभावी वाचन
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील हेत गावचे सुपुत्र असलेल्या नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील विविध जिल्हा परिषद व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक आणि केंद्रप्रमुख तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी नारायण सुर्वे यांच्या कवितांचे प्रभावी वाचन करून उपस्थितांची मने जिंकली.

मान्यवरांनी केले उपक्रमाचे कौतुक
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कविवर्य नारायण सुर्वे आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.यावेळी संस्थेचे विश्वस्त व स्थानिक समितीचे सचिव प्रमोद रावराणे, प्रमुख वक्त्या डॉ. दर्शना कोलते, गटशिक्षणाधिकारी प्रजापती थोरात, उपप्राचार्य डॉ. माणिक चौगुले, स्टाफ सचिव प्रा. सुरेश पाटील, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. राहुल भोसले आणि एस. एन. पुरीबुवा उपस्थित होते.
   
गटशिक्षणाधिकारी थोरात यांनी या अभिनव साहित्यिक उपक्रमाचे कौतुक करून आयोजकांना शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या स्थानिक समितीचे सचिव प्रमोद रावराणे यांनी कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट करताना, साहित्यिक विचारांचा समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले.

विद्यार्थ्यांनी सुर्वे यांच्या विचारांतून प्रेरणा घ्यावीअध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. के. आर. चव्हाण यांनी नारायण सुर्वे यांच्या साहित्याचे सामाजिक महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या साहित्याचा अभ्यास करून त्यातील सामाजिक जाणीव, संघर्षशीलता आणि मानवतावादी दृष्टिकोन आत्मसात करावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संजीवनी पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. निलेश कारेकर यांनी केले, तर आभार प्रा. डी. एस. बेटकर यांनी मानले.

error: Content is protected !!