डॉ. स्मिता जाधव व कौस्तुभ गावडे यांना विजयी करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आमदार प्रमोद जठार यांचे आवाहन
राधानगरी (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या वतीने राधानगरी-भुदरगड-आजरा पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार बैठक उत्साहात संपन्न झाली. पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार डॉ. स्मिता जाधव तसेच शिक्षक मतदारसंघातील उमेदवार कौस्तुभ गावडे यांना विजयी करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन आमदार प्रमोद जठार यांनी यावेळी केले.
पदवीधर आणि शिक्षक हे समाजातील दिशा देणारे महत्त्वाचे घटक असून, बदलत्या काळातील आव्हाने आणि नव्या पिढीच्या अपेक्षा समजून घेणे आवश्यक आहे. “Gen-Z पिढीचे प्रश्न पदवीधर आणि शिक्षकांनी समजून घेतले पाहिजेत. त्यांच्या अपेक्षा, शिक्षण, रोजगार आणि भविष्यातील संधी याबाबत सकारात्मक दृष्टिकोनातून काम करण्याची गरज आहे,” असे आमदार जठार यांनी सांगितले.
देशाला २०४७ पर्यंत विकसित आणि महासत्ता बनविण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी शिक्षण क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचेही त्यांनी नमूद केले. या व्यापक उद्दिष्टासाठी पदवीधर, शिक्षक आणि युवा पिढीला सोबत घेऊन विकासाची दिशा मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी केले.
“पुणे पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना विजयी करण्यासाठी सर्वांनी मतदारांपर्यंत पोहोचून प्रभावीपणे प्रचार करावा,” असा निर्धारही आमदार जठार यांनी व्यक्त केला.
यावेळी कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ इमानत, शिवसेना तालुकाप्रमुख संग्राम सावंत, गारगोटीचे उपसरपंच भरत शेट्ये, भगवान शिंदे यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.












