उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे यांची प्रमुख उपस्थिती; सिंधुदुर्गनगरीत कायदेविषयक व्याख्यानाचे आयोजन
ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सुपुत्र आणि जिल्हा वकील संघटनेच्या माजी सदस्य ॲड. लाडगेट ऊर्फ राकेश दत्ताराम बिले यांची महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागात सचिव तथा वरिष्ठ विधी सल्लागारपदी झालेली नियुक्ती जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेतर्फे रविवारी (ता. १८) सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा नियोजन समितीच्या सिंधुनिती सभागृहात सकाळी १०.३० वाजता त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती शैलेश पी. ब्रह्मे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, त्यांचे कायदेविषयक मार्गदर्शनपर व्याख्यानही आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. परिमल गजानन नाईक यांनी दिली.
सिंधुदुर्गनगरी येथील पत्रकार कक्षात गुरुवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष ॲड नीलिमा गावडे, ॲड सचिव यतीश खानोलकर, सहसचिव ॲड अक्षय चिंदरकर,ॲड शामराव सावंत आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना ॲड नाईक यांनी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून वकिली व्यवसायाची वाटचाल सुरू केलेल्या ॲड. बिले यांनी राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागात महत्त्वाच्या पदापर्यंत मजल मारली आहे. जिल्हा वकील संघटनेचे माजी सदस्य असलेल्या बिले यांचा गौरव व्हावा, अशी जिल्ह्यातील वकील बांधवांची इच्छा होती. त्यानुसार संघटनेने या सत्कार समारंभाचे आयोजन केले आहे. न्यायमूर्ती ब्रह्मे यांना प्रमुख उपस्थितीसाठी विनंती केली असता त्यांनी ती मान्य केली. त्यामुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधीर देशपांडे उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील लॉ कॉलेजचे विद्यार्थी, जिल्ह्यातील वरिष्ठ, कनिष्ठ, नवोदित वकील यांनाही यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.












