वीजेच्या धक्क्याने जखमी कामगाराच्या न्यायासाठी आचरा वीज कार्यालयाला घेराव !

उपचारांसाठी तातडीच्या आर्थिक मदतीची मागणी; अपघाताची जबाबदारी निश्चित करण्यासाठी दोन तास आंदोलन

वीज वितरणविरोधात फौजदारी तक्रार दाखल करण्याचा ग्रामस्थांचा इशारा; भाजप-शिवसेना पदाधिकारी आक्रमक

आचरा (प्रतिनिधी) : वायंगणी-पाटवाडी येथे विद्युत खांबावर डीपीचे काम करताना विजेचा जोरदार धक्का लागून कंत्राटी कामगार राजेश गोपाळ पाटणकर (वय ३२, रा. चिंदर, गावठणवाडी) गंभीर जखमी झाल्याच्या घटनेचे पडसाद शुक्रवारी आचरा येथे उमटले. जखमी कामगाराच्या उपचारांसाठी तातडीने आर्थिक मदत द्यावी आणि या अपघाताची जबाबदारी निश्चित करावी, या मागण्यांसाठी भाजप-शिवसेना पदाधिकारी आणि परिसरातील ग्रामस्थांनी आचरा वीज वितरण कार्यालयावर धडक देत सुमारे दोन तास घेराव घातला. अपघाताच्या जबाबदारीवरून यावेळी वीज वितरण अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाले. मागण्या मान्य न झाल्यास वीज वितरण विभागाविरोधात फौजदारी तक्रार दाखल करून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

काल सायंकाळी वायंगणी-पाटवाडी येथे विद्युत खांबावर डीपीचे काम सुरू असताना राजेश पाटणकर यांना विजेचा जोरदार धक्का बसला. या दुर्घटनेत ते गंभीर जखमी झाले. त्यांना प्रथम आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी कणकवली येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेनंतर शुक्रवारी ग्रामस्थांसह भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आचरा वीज वितरण कार्यालयात धडक देत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला.

जबाबदारी कोणाची? अधिकाऱ्यांना ग्रामस्थांचा सवाल

आंदोलनादरम्यान अपघाताची जबाबदारी निश्चित करण्याच्या मुद्द्यावरून वातावरण तापले. भाजप आचरा प्रभारी संतोष गांवकर यांनी, वीज वितरण विभागाने या घटनेची जबाबदारी स्वीकारल्याशिवाय कार्यालयातून हलणार नसल्याची ठाम भूमिका घेतली. यावेळी वीज वितरण अधिकाऱ्यांनी अपघातासाठी ठेकेदार जबाबदार असल्याचे सांगितल्याने उपस्थित ग्रामस्थ अधिक आक्रमक झाले. एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याऐवजी जखमी कामगाराला न्याय मिळवून देण्यासाठी ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

वीजपुरवठा बंद असल्याचे सांगितल्यानंतरच काम सुरू केल्याचा ठेकेदाराचा दावा

संबंधित ठेकेदार गोवेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, राजेश पाटणकर हा आपला कामगार असून तो पूर्णपणे बरा होईपर्यंत त्याच्या उपचारांची जबाबदारी आपण घेतली आहे. मात्र, अपघाताची जबाबदारी आपली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वीज वितरण विभागाकडून कामासाठी बोलावण्यात आले होते. विद्युत पुरवठा बंद करण्यात आला असून काम सुरू करण्यास हरकत नसल्याचे सांगण्यात आल्यानंतरच कामाला सुरुवात करण्यात आली. वीजपुरवठा बंद असल्याचे सांगितल्यामुळे कामगार विद्युत खांबावर चढला; मात्र काम सुरू असतानाच त्याला विजेचा धक्का बसून तो खाली पडला, असा दावा ठेकेदाराने केला. विद्युत पुरवठा सुरू किंवा बंद करण्याची जबाबदारी वीज वितरण विभागाची असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठेकेदाराच्या या स्पष्टीकरणानंतर ग्रामस्थांनी पुन्हा वीज वितरण अधिकाऱ्यांना जाब विचारला. अपघात नेमका कशामुळे घडला, याची सखोल चौकशी करून संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी आणि दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

भाजप-शिवसेना पदाधिकारी आंदोलनात सहभागी

या आंदोलनात कंत्राटी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, भाजप तालुका पदाधिकारी धोंडी चिंदरकर, भाजप आचरा प्रभारी संतोष गांवकर, पंचायत समिती सदस्य दीपक सुर्वे, महेश वरक, देवेंद्र हडकर, एकनाथ पवार, शाहुलखन बांदिवडेकर, विनोद लब्दे, गणेश पाटणकर, विनायक मसुरकर, विराज सावंत, संतोष अपराज, सागर अपराज, बाळू वस्त, रवींद्र घागरे, अरुण माने, शंकर गांवकर, संजय लोके, ठेकेदार गोवेकर, सागर परब, गिरीश पवार, सचिन जाधव, अमोल घाडी आणि आशिष तोंडवळकर उपस्थित होते.

शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, उपाध्यक्ष महेश राणे, आचरा जिल्हा परिषद सदस्य वर्षा सांबारी, वायंगणी सरपंच रुपेश पाटकर, आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, आचरा उपसरपंच संतोष मिराशी, शिवसेना आचरा विभागप्रमुख संतोष कोदे, मनोज हडकर, भाऊ हडकर, बाबू परुळेकर, अभय भोसले आणि चंदू सावंत आदींनीही आंदोलनात सहभाग घेतला. त्यांनी वीज वितरण विभागाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत अपघाताची चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली.

मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

गंभीर जखमी राजेश पाटणकर यांच्या प्रकृतीबाबत ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली. त्यांच्या उपचारांसाठी तातडीने आर्थिक मदत द्यावी, अपघाताची जबाबदारी निश्चित करावी आणि संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, या मागण्यांवर आंदोलनकर्ते ठाम राहिले. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास वीज वितरण विभागाविरोधात फौजदारी तक्रार दाखल करून पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

दरम्यान, आंदोलनाची माहिती मिळताच आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कतविले घटनास्थळी दाखल झाले. सुमारे दोन तास चाललेल्या घेरावानंतर आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले. मात्र, जखमी कामगाराला न्याय मिळेपर्यंत आणि अपघाताची जबाबदारी निश्चित होईपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!