जांभळ स्टॉप ते प्राथमिक आरोग्य केंद्रादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा गवताची मोठी वाढ; झाडीची तातडीने छाटणी करण्याची सामाजिक कार्यकर्ते रुझाय फर्नांडिस यांची मागणी
कणकवली (प्रतिनिधी) : कळसुली गावातील जांभळ स्टॉप ते प्राथमिक आरोग्य केंद्रादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडी आणि गवत वाढले आहे. हे गवत थेट मुख्य रस्त्यावर आल्याने वाहनचालकांना वाहतूक करताना अडचणींचा सामना करावा लागत असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. रस्त्याच्या कडेला वाढलेल्या झाडीमुळे वाहनचालकांना समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज घेणे कठीण होत आहे. विशेषतः दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांसाठी ही परिस्थिती धोकादायक ठरू शकते. त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी आणि गवत तातडीने तोडण्याची आवश्यकता आहे. या गंभीर समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष द्यावे. संबंधित रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत व झाडी हटवून रस्ता वाहतुकीसाठी सुस्थितीत करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रुझाय फर्नांडिस यांनी केली आहे.












