किनई रोडवरील मासेविक्री बंद करण्याची नगरसेविका आर्या राणे यांची मागणी; सुसज्ज मच्छी मार्केटमध्येच विक्री करण्याचे आवाहन
कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील मसुरकर किनई रोडवर सुरू असलेल्या मासेविक्रीमुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, नागरिकांना तसेच या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्येकडे लक्ष वेधत किनई रोडवरील रस्त्यावर होणाऱ्याअनधिकृत मासेविक्रीला पायबंद घालण्यात यावा, अशी मागणी नगरसेविका आर्या राणे यांनी केली आहे.
कणकवली शहरात नागरिकांच्या सोयीसाठी स्वतंत्र आणि सुसज्ज मच्छी मार्केट उपलब्ध आहे. तसेच किनई रोडलगतच कलमठ ग्रामपंचायतीचे मच्छी मार्केटही आहे. त्यामुळे मसुरकर किनई रस्त्यावर मासेविक्री करण्याऐवजी मासे विक्रेत्यांनी या उपलब्ध बाजारपेठांमध्येच मासेविक्री करावी, अशी भूमिका नगरसेविका आर्या राणे यांनी मांडली आहे.
किनई रोड हा परिसरातील नागरिकांसह वाहनचालकांसाठी महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, रस्त्यावर मासेविक्री होत असल्याने खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची तसेच ग्राहकांच्या वाहनांची गर्दी होते. परिणामी वाहनांच्या ये-जा करण्यास अडथळे निर्माण होतात. त्यातच मासेविक्रीनंतर उरणारे मासळीचे अवशेष, सांडपाणी आणि अस्वच्छतेमुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. याचा त्रास स्थानिक रहिवाशांसह या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही सहन करावा लागत आहे.
मच्छी विक्रेत्यांसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध असतानाही मसुरकर किनई रस्त्यावर विक्री होत असल्यास त्यावर नगरपंचायत प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. शहरातील सुसज्ज मच्छी मार्केटचा योग्य वापर व्हावा आणि कलमठ ग्रामपंचायतीच्या मच्छी मार्केटमध्येही विक्रेत्यांना व्यवसायासाठी प्रोत्साहन मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मासेविक्रीला विरोध नसून ती योग्य आणि नियोजित ठिकाणी व्हावी, हाच या मागणीमागील मुख्य उद्देश असल्याचे नगरसेविका आर्या राणे यांच्या भूमिकेतून स्पष्ट होत आहे. नागरिकांचे आरोग्य, परिसरातील स्वच्छता आणि वाहतुकीची सुरक्षितता या बाबींचा विचार करून नगरपंचायत प्रशासनाने या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करावी. किनई रोडवरील मासेविक्रीबाबत योग्य निर्णय घेऊन परिसरातील नागरिकांना दुर्गंधी आणि वाहतूक कोंडीच्या त्रासातून दिलासा द्यावा, अशी मागणी नगरसेविका आर्या राणे यांनी केली आहे.
शहरातील बाजारपेठा आणि रस्ते हे नागरिकांच्या सोयीसाठी असून, त्यांचा वापर करताना स्वच्छता व वाहतूक शिस्त राखणे गरजेचे आहे. त्यामुळे या प्रश्नावर नगरपंचायत प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.














