आचऱ्याच्या शिल्पा गांवकर-डोंगरेची महाराष्ट्र संघात निवड

मुंबईत रंगणार राष्ट्रीय दिव्यांग क्रिकेटचा थरार….!

१ ते ४ नोव्हेंबरदरम्यान ‘ऑल एबिलिटी राष्ट्रीय दिव्यांग क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा २०२६

आचरा (प्रतिनिधी) : दिव्यांग क्रिकेटपटूंना राष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य दाखविण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘ऑल एबिलिटी राष्ट्रीय दिव्यांग क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. १ ते ४ नोव्हेंबर दरम्यान मुंबईत रंगणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानचे संघ सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेसाठी आचरा गावची सुकन्या शिल्पा गांवकर-डोंगरे हिची महाराष्ट्र संघात निवड झाली असून, तिच्या निवडीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. शिल्पा हिने यापूर्वी अनेक दिव्यांग क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभागी होत दमदार कामगिरी केली आहे. राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने तिच्या क्रीडा कारकिर्दीतील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

दिव्यांग क्रिकेट नियामक मंडळ, एस४यूए फाउंडेशन आणि दिव्यांग व्हीलचेअर क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेची अधिकृत घोषणा मुंबईतील द सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली.

या पत्रकार परिषदेला दिव्यांग क्रिकेट नियामक मंडळाचे संयुक्त अध्यक्ष आणि व्हीलचेअर क्रिकेट विभागाचे अध्यक्ष डॉ. भगवान तलवारे, मंडळाचे महासचिव हारून रशीद तसेच एस४यूए फाउंडेशनच्या संस्थापक उपस्थित होत्या.

स्पर्धेतील सर्व सामने २० षटकांच्या स्वरूपात खेळविण्यात येणार आहेत. दिव्यांग क्रिकेटपटूंना आपली प्रतिभा, जिद्द आणि क्रीडाकौशल्य दाखविण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.

या स्पर्धेमुळे दिव्यांग क्रिकेटला प्रोत्साहन मिळण्याबरोबरच खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. मुंबईत होणाऱ्या या राष्ट्रीय स्पर्धेकडे क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले आहे. आचऱ्याच्या शिल्पा गांवकर-डोंगरे हिच्या सहभागामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे.

error: Content is protected !!