कणकवली (प्रतिनिधी) : संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था, मुंबई महाराष्ट्र (कार्य क्षेत्र संपूर्ण भारत देश) या संस्थेचे संस्थापक तथा राज्याध्यक्ष संजय (ऊर्फ) छोटू कदम साहेब यांच्या ४८ व्या वाढदिवसानिमित्त सोमवार 2 नोव्हेंबर रोजी विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून केवळ उत्सव साजरा न करता समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे.
संजय कदम यांच्या वाढदिवसानिमित्त 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 12 वा. दरम्यान भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन जिल्हा रुग्णालय रक्तपेढी सिंधुदुर्गनगरी येथे करण्यात आले असून, या माध्यमातून रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना जीवनदान देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच रक्तदान हे श्रेष्ठदान असून, समाजातील अधिकाधिक रक्तदात्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था मुंबई महाराष्ट्र या सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.
यासोबतच जिल्हा रुग्णालयात रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना मोफत फळांचे वाटप करण्यात येणार आहे. आजारपणाच्या काळात रुग्णांना मानसिक आधार मिळावा आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच भिरवंडे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर 1 मधील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होऊ नयेत आणि त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू आहे.
समाजातील अनाथ तसेच गरजू व्यक्तींनाही या उपक्रमातून मदतीचा आधार देण्यात येणार असून, त्यांना ब्लँकेटचे वाटप केले जाणार आहे. विशेषतः गरजू व्यक्तींना दिलासा मिळावा आणि त्यांच्या जीवनात माणुसकीची ऊब निर्माण व्हावी, या भावनेतून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, मानवता, शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवेचा विचार पुढे नेण्याचे कार्य केले जात आहे. संजय कदम यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य दिल्याने त्यांच्या या सामाजिक दृष्टिकोनाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
वाढदिवस म्हणजे केवळ शुभेच्छा, सत्कार आणि जल्लोष नव्हे, तर आपल्या आनंदात समाजातील वंचित, गरजू आणि दुःखी व्यक्तींनाही सहभागी करून घेण्याची संधी असते. हाच विचार केंद्रस्थानी ठेवून आयोजित करण्यात आलेले हे उपक्रम समाजाप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित करणारे ठरणार आहेत. संजय कदम यांच्या ४८ व्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या या सेवाभावी उपक्रमांचे सर्वत्र स्वागत होत आहे.












