डाव्या पायाच्या जखमेतून संदिप परब यांनी काढले ४८ किडे;
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून समर्थ आश्रमात प्रवेश
खारेपाटण (प्रतिनिधी) : सांताक्रुझ- कालीना परिसरात गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर बेवारस ! आणि असहाय परिस्थितीत असलेल्या चिन्नमा आनंद नायर या आजींना जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांनी मदतीचा हात देत सुरक्षित निवारा उपलब्ध करून दिला.
रस्त्यावर राहिल्यामुळे त्यांच्या आरोग्याचीही गंभीर समस्या निर्माण झाली होती. त्यांच्या डाव्या पायाला झालेल्या जखमेत आढळलेले तब्बल ४८ किडे यावेळी काढण्यात आले. त्यांच्या या वेदनादायी अवस्थेत त्यांना आधाराची आणि योग्य देखभालीची नितांत गरज होती.
जीवन आनंद संस्थेच्या पुढाकाराने आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना संस्थेच्या विरार फाटा येथील समर्थ आश्रम येथे दाखल करण्यात आले. त्यामुळे आता या आजींना सुरक्षित ठिकाणी निवारा मिळाला असून, त्यांच्या पुढील देखभालीसाठी मदतीचा मार्ग खुला झाला आहे.
या सेवाकार्यात स्वयंसेविका अनिता डिसूझा, संस्थेचे कार्यकर्ते गोविंद मार्गी, श्रेया घाडीगांवकर, भूषण मार्गी आणि कविता कदम यांनी सहकार्य केले. रस्त्यावर निराधार अवस्थेत जगणाऱ्या व्यक्तींना केवळ निवारा देणे नव्हे, तर त्यांना सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून देणे, हा जीवन आनंद संस्थेच्या कार्याचा मुख्य उद्देश आहे. चिन्नमा आनंद नायर यांना मिळालेला हा आधार म्हणजे निराधारांच्या सेवेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे आणखी एक उदाहरण आहे.
“रस्त्यावर निराधार अवस्थेत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित निवारा आणि सन्मानाने जगण्याची संधी मिळावी, यासाठी जीवन आनंद संस्था सदैव प्रयत्नशील आहे.” असे यावेळी संदिप परब यांनी म्हटले.











