तळेरे (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावरील तळेरे येथील सर्व्हिस रस्त्यावरील ओढ्यानजिकच्या ब्रीज जवळ अचानक डंपरच्या मागील चाकाखाली सापडून तळेरे येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघातातील मयत रोहिदास हरिश्चंद्र देसाई (वय ६०) असे त्या व्यक्तीचे नाव असून सदरची घटना शनिवारी सकाळी ११.३० च्या दरम्यान घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तळेरे येथील सर्व्हिस रस्त्यावरून कासार्डेच्या दिशेने डंपर जात असताना रोहिदास देसाई हे डंपरच्या मागील चाकाखाली अचानक आले. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. ते नेमके कोणत्या परिस्थितीत डंपरच्या मागील चाकाखाली अचानक कसे आले याबाबत ठोस माहिती मिळालेली नाही.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. शनिवारी रात्रौ उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. देसाई हे मुंबई येथे वास्तव्यास होते. काही कामानिमित्त ते आपल्या मूळ गावी तळेरे येथे आले होते. मृत देसाई यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली असा परिवार आहे.












