कणकवली (प्रतिनिधी) : रिक्षा चालक-मालक संघटनेच्या वतीने आयोजित भव्य टर्फ क्रिकेट स्पर्धेचा नुकताच मोठ्या उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला. या स्पर्धेचे उद्घाटन कणकवलीचे उपसभापती सोनू सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून भाजप कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे, संजय मालडकर यांच्यासह रिक्षा चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी आणि शहरातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाप्रसंगी मनोगत व्यक्त करताना उपसभापती सोनू सावंत म्हणाले की, “रिक्षा चालकांचे जीवन धावपळीचे आणि कष्टाचे असते. रोजच्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून अशा क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे कौतुकास्पद आहे. खेळाच्या माध्यमातून शारीरिक तंदुरुस्तीसोबतच रिक्षा चालकांमध्ये बंधुभाव आणि एकोपा वाढीस लागतो.” तसेच त्यांनी सर्व सहभागी खेळाडूंना व संघांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.अण्णा कोदे यांच्या हस्ते पहिल्या सामन्याची नाणेफेक करण्यात आली. या प्रसंगी कणकवली तालुक्यातील क्रीडाप्रेमी आणि रिक्षा चालक-मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.












