दिपसंध्या’संगीत मैफिल ठरली लक्षवेधी !

भावगीत, भक्तिगीत आणि नाट्यगीतांच्या स्वरांनी कणकवलीत रंगली मैफिल

कणकवली (प्रतिनिधी) : दिवाळीच्या निमित्ताने स्वरगंध २०२६ या उपक्रमा अंतर्गत दीपावलीच्या मंगलमय वातावरणात भावगीत, भक्तिगीत आणि नाट्यगीतांच्या सुरेल स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणारी ‘दिपसंध्या’ ही संगीत मैफिल कणकवलीत मंगळवारी , दि.१० नोव्हेंबर रोजी उत्साहात झाली. कणकवली , टेंबवाडी येथील नागेश्वर मित्र मंडळ आयोजित आणि आदर्श संगीत विद्यालय, कणकवली प्रस्तुत या कार्यक्रमाचे संयोजन संगीत अलंकार संदीप पेंडुरकर व तेजस्विता पेंडुरकर यांनी केले होते.

या मैफिलीची सुरुवात तेजस्विता पेंडुरकर यांच्या ‘सुरातुनी या मला भेटण्या’ या गीताने झाली. त्यानंतर प्राजक्ता ठाकुरदेसाई हिने ‘आली माझ्या घरी ही दिवाळी’, ‘नवीन आले साल आज’, ‘हसले मनी चांदणे’, ‘लक्ष्यदीप हे उजळले’ आणि ‘नरवर कृष्णा समान’ अशी बहारदार गीते सादर केली. स्वरांगी गोगटे हिने ‘निर्गुणाचे भेटी’, ‘उगवला चंद्र पुनवेचा’, ‘तारिणी नव वसन धारिणी’ आणि ‘प्रीतीचा कल्पतरू जो मला लाभला’ या गीतांतून सुरांची रंगत वाढवली.

विदिता जोशी हिने ‘बगळ्यांची माळ फुले’, ‘एकाच या जन्मी जणू’, ‘कानडा राजा पंढरीचा’ आणि ‘अवघे गर्जे पंढरपूर’ ही गीते सादर करून रसिकांची दाद मिळवली. तेजस्विता पेंडुरकर यांनी ‘अमृताची फळे’, ‘हे चांदणे फुलांनी’ यांसह ‘स्वामी कृपा कधी करणार’ आणि ‘अगा वैकुंठीचा राया’ या भैरवीतील रचनांनी मैफिलीचा समारोप केला. संदीप पेंडुरकर यांनी ‘ध्यान लागले रामाचे’, या जन्मावर,या जगण्यावर शतदा प्रेम करावे ही गीते सादर केली.
कार्यक्रमाचे श्रीधर पाचंगे, विदिता जोशी आणि प्राजक्ता ठाकुरदेसाई यांनी सूत्रसंचालन प्रभावीपणे केले. संगीतसाथ हार्मोनियमवर संदीप पेंडुरकर, तबल्यावर असित करंदीकर, तबला व ढोलकवर शेखर सर्पे, ऑक्टोपॅडवर श्रीधर पाचंगे, तर तालवाद्यावर मंथन चव्हाण व आरोह पेंडुरकर यांनी केली. ध्वनी व्यवस्था नाना डंबे यांच्या समर्थ साऊंड, कणकवली यांनी सांभाळली.

विविध संगीतप्रकारांचा सुरेल संगम, गायकांचे बहारदार सादरीकरण आणि दर्जेदार वाद्यसंगती यामुळे दिपसंध्या ही मैफिल रसिकांच्या स्मरणात राहणारी ठरली. संगीत रसिकांनी काही गाण्यांची फर्माईश केली. नागेश्वर मित्रमंडळाचे अध्यक्ष सुधाकर राणे व अन्य पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांचे आभार मानले.

error: Content is protected !!