जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा-२०२६

२४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक पंचायत महाराष्ट्र-सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे आयोजन

वैभववाडी (प्रतिनिधी) : २४ डिसेंबर या “राष्ट्रीय ग्राहक दिना” निमित्त ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने “जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा-२०२६” चे आयोजन करण्यात आले आहे.

संपूर्ण अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेला ग्राहक राजा सजग व्हावा, त्याला आपले हक्क, अधिकार आणि कर्तव्यांची जाणीव व्हावी, ग्राहक चळवळ विद्यार्थी वर्ग व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचावी, ग्राहक संरक्षण कायद्याच्या प्रसाराबरोबरच शोषणमुक्त समाज निर्मितीसाठी २४ डिसेंबर या “राष्ट्रीय ग्राहक दिना”निमित्त ग्राहक पंचायत महाराष्ट्र-सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा-२०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. सदर निबंध स्पर्धा बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा वैभववाडी आणि पोलीस ठाणे, वैभववाडी यांनी पुरस्कृत केली आहे.

सदर निबंध स्पर्धा कनिष्ठ महाविद्यालय गट, महाविद्यालय गट व खुला गट अशा तीन गटात आयोजित केली असून निबंध स्पर्धेचा सविस्तर तपशिल पुढील प्रमाणे-
१) पहिला गट- कनिष्ठ महाविद्यालयीन गट
(इयत्ता ११ वी व १२ वी)
विषय- ग्राहक संरक्षण ही काळाची गरज.
शब्दमर्यादा- ४०० ते ५००

२) दुसरा गट- महाविद्यालय गट
विषय- डिजिटल युगातील ग्राहक संरक्षण: समस्या, आव्हाने आणि उपाययोजना
शब्दमर्यादा- ५०० ते ६००

३) तिसरा गट- खुला गट
विषय- विकसित भारताच्या निर्मितीत जागृत ग्राहकांचे योगदान.
शब्दमर्यादा- ६०० ते ७००

स्पर्धकांनी आपला निबंध विषयाला अनुसरून, स्वतंत्रपणे फुलस्केप आकाराच्या पानाच्या एका बाजूला स्वच्छ अक्षरात लिहिलेला असावा.
इंटरनेट, पुस्तके व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या साधनांचा वापर केल्यास तसे संदर्भ नमूद करावेत.निबंधाची निवड व गुणांकन संस्थेच्या तज्ञ परिक्षकांकडून करण्यात येईल.परिक्षकींचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील. या निबंध स्पर्धेत संस्थेचे पदाधिकारी व सदस्य यांना सहभागी होता येणार नाही याची नोंद घ्यावी.

प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे रोख रु.५०१/-, ४०१/- व ३०१/-, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमात गौरविण्यात येईल. तरी जिल्ह्यातील अधिकाधिक स्पर्धकांनी यामध्ये सहभागी व्हावे. स्पर्धकांनी आपले निबंध १५ डिसेंबर पर्यंत अध्यक्ष /सचिव, ग्राहक पंचायत महाराष्ट्र, सिंधुदुर्ग जिल्हा शाखा कार्यालय घर नं.५४४ मु. पो. ता.वैभववाडी, जि.सिंधुदुर्ग 416 810 या पत्त्यावर पाठवावेत.
अधिक माहितीसाठी जिल्हा अध्यक्ष प्रा. एस. एन. पाटील (9834984411), संघटक- विष्णुप्रसाद दळवी (9869854523) व सचिव संदेश तुळसणकर (9420100946) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र- सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने केले आहे.

error: Content is protected !!