संविधानाच्या मूल्यांचा जागर नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सेल्फी पॉईंटचे अनावरण
खारेपाटण (प्रतिनिधी) : शेठ न. म. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, खारेपाटण येथे भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शक म्हणून अॅड. कुमारी प्रमिला शेट्ये उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाने करण्यात आली. यावेळी अॅड. कुमारी प्रमिला शेट्ये यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचा अभ्यास, संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार व कर्तव्ये, लोकशाही मूल्ये तसेच भारतीय संविधानाचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी संविधानाचा अभ्यास करून एक जबाबदार व जागरूक नागरिक बनावे, असे आवाहन त्यांनी आपल्या व्याख्यानातून केले.
संविधानाविषयी जनजागृती निर्माण व्हावी व संविधानातील मूल्यांचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा या उद्देशाने विद्यालयात आकर्षक संविधान सेल्फी पॉईंटचे अनावरण करण्यात आले. तसेच चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते .या उपक्रमाला विद्यार्थी व शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाला खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त भिकाजी कर्ले, विद्यालयाचे प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, पालकर साहेब, प्रशालेतील शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संविधान दिनानिमित्त आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी आदर, जागरूकता आणि लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण करण्याचा स्तुत्य प्रयत्न विद्यालयाच्या वतीने करण्यात आला.












