भालावल (प्रतिनिधी) : २६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त भालावल येथे संविधान गटातील महिला आणि शाळेतील विद्यार्थ्यांच्या सहभागातून संविधान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व महिला आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. यावेळी संविधान म्हणजे काय, संविधानाने नागरिकांना दिलेले मूलभूत अधिकार, तसेच स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या संविधानातील मूल्यांचे महत्त्व याबाबत माहिती देण्यात आली.
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने भारतीय संविधानाचा स्वीकार केला आणि २६ जानेवारी १९५० पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली, या ऐतिहासिक दिवसाचे महत्त्वही विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. ही माहिती संविधान गटाच्या CRP लक्ष्मी परब यांनी विद्यार्थ्यांना दिली. यानंतर शाळेपासून ग्रामपंचायतीपर्यंत संविधान जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये ‘भारताचा अभिमान आहे संविधान’, ‘संविधानाचा करूया सन्मान’ अशा विविध घोषणांद्वारे संविधानाबद्दल जनजागृती करण्यात आली. विशेष म्हणजे संविधानातील विविध कलमे आणि त्यांच्याशी संबंधित घोषवाक्यांचे फलक तयार करण्यात आले होते.
या संपूर्ण रॅलीचे नियोजन संविधान गटातील महिलांनी स्वतः पुढाकार घेऊन केले. फलक तयार करणे, घोषवाक्ये ठरवणे, विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणे अशा सर्व जबाबदाऱ्या महिलांनी पार पाडल्या. महिलांनी स्वतः संविधानाची माहिती समजून घेत ती विद्यार्थ्यांपर्यंत आणि नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
यावेळी शाळेचे चे मुख्याध्यापक गोंडूजी गोवर्धन ढवळी, उपशिक्षक विठ्ठल कुंभार सर, पदवीधर शिक्षक रुपेशकुमार गुंजाळ सर, MASUM फेलो फिजा मकानदार, CRP लक्ष्मी परब, आशा सेविका अपूर्वा सावंत, ग्रामसंघ अध्यक्षा नेहा परब आणि सदस्य रिया परब उपस्थित होते. कार्यक्रमाची माहिती लक्ष्मी परब यांनी दिली, तर उपस्थितांचे आभार रिया परब यांनी मानले.
या उपक्रमामुळे महिला आणि विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली. तसेच महिलांनी स्वतः पुढाकार घेऊन रॅलीचे नियोजन केल्यामुळे त्यांच्यात नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि सामूहिक सहभागाची भावना वाढीस लागली.












