माजी खासदार निलेश राणे यांनी दिली आंदोलन स्थळी भेट
आंदोलनानंतर महिलेची तक्रार घेऊन गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात
कुडाळ (प्रतिनिधी) : मंगळवार दिनांक ३० मे रोजी कुडाळ तालुक्यातील सरंबळ गावातील तलाठ्याने एका महिलेशी असभ्य वर्तन केल्यानंतर सदर महिलेने कुडाळ पोलीस स्थानकात तक्रार देण्यासाठी आली असता महिलेची तक्रार दाखल करून न घेता महिलेशी असभ्य वर्तन करणाऱ्या गावचे तलाठी किरण सोनावणे यांना कुडाळ पोलीस पाठीशी घालत असल्याचे संबंधितांना दिसून आले व काल घडलेल्या घटनेची तक्रार आज सकाळपर्यंत दाखल करून न घेतल्याने पोलिसांच्या विरोधात कुडाळ व सरंबळ येथील नागरिकांकडून महिलेची तक्रार दाखल करून घेऊन तलाठयावर पोलीसांनी गुन्हे दाखल करावे व महिलेला न्याय द्यावा या मागणीसाठी आज बुधवार दिनांक ३१ मे सकाळी ११ वाजल्यापासून सरंबळ सरपंच रावजी कदम , उपसरपंच सागर परब यांच्यासह मनसेचे धीरज परब व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा दिपलक्ष्मी पडते यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन सुरू केले होते. काँग्रेसचे काका कुडाळकर यांनीही यावेळी पाठिंबा दिला होता. दरम्यान माजी खासदार निलेश राणे यांनीही आंदोलन स्थळी भेट देत आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेत तक्रार दाखल करण्यास सांगितले व त्या महिलेस योग्य न्याय मिळवून देवू असे आश्वासन दिले.
याबाबत काल मंगळवारी विनयभंग झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत सदर पीडित महिला कुडाळ पोलिस स्टेशनमध्ये येवून आपली गावचे तलाठी किरण सोनावणे यांच्या विरोधात तक्रार दाखल करा, अशी आर्त विनंती करीत असताना पोलीसांनी तिची तक्रार दाखल करून न घेता उलट त्या शासकीय कर्मचाऱ्याची तक्रार दाखल करून घेतली होती. परंतु त्या महिलेची तक्रार दाखल करण्यास पोलीसांनी टाळाटाळ केली होती. अशी माहिती सरपंच रावजी कदम यांनी यावेळी दिली.
या पार्श्वभूमीवर आज बुधवारी संतप्त झालेल्या नागरिकांनी सकाळी ११ वाजल्यापासून महिलेला न्याय मिळवण्यासाठी हे आंदोलन सुरूच ठेवले होते. अखेर कुडाळ पोलीस निरीक्षक शंकर चिंदरकर यांनी त्या महिलेची तक्रार दाखल करून घेणार असल्याचे आंदोलनकर्त्याना आश्वासन दिल्यानंतर हे ठिय्या आंदोलन नागरिकांनी मागे घेतले. तर त्या महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल होणार असल्याचे कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील यानी बोलताना सांगितले.













