ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच भास्कर परब यांनी केली मागणी
गावासाठी त्वरित स्वतंत्र तलाठी मिळावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने भास्कर परब यांनी केली आहे
कुडाळ (अमोल गोसावी) : तेर्से बांबर्डे गावासाठी त्वरित स्वतंत्र तलाठी मिळावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने भास्कर परब यांनी केली आहे मागील अनेक वर्षे तेर्से बांबर्डे गावासाठी स्वतंत्र तलाठी नाही. तेर्सेबाबर्डे, बिबवणे आणि मांडकुली या तीन गावाची मिळून सजा आहे. या सजासाठी मागील अनेक वर्षे एकच तलाठी कार्यरत असल्याने शेतकरी, विद्यार्थी यांना आवश्यक कागदपत्रे मिळविण्यासाठी अनेक हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे नागरिकांच्या वेळेचा आणि पैशाचा अपव्यय होतो. परिणामी शासकीय कामांचा लाभ घ्यायला मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतात. तरी याबाबत एक महिन्याच्या आत पूर्तता करावी. अन्यथा तेर्से बांबर्डे ग्रामस्थांना घेऊन आंदोलन छेडण्याचा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा तेर्से बांबर्डे माजी सरपंच भास्कर परब यांनी दिला आहे. मध्यंतरी शासनाच्या माध्यमातून तेर्से बांबर्डे
गावासह मांडकुली, बिबवणे या गावांसाठी स्वतंत्र तलाठी मंजूर केला असे जाहीर केले होते. पण अद्याप या गावांसाठी स्वतंत्र तलाठी मिळाला नाही. परिणामी, तिन्ही गावातील शेतकऱ्यांची महसूल संबंधित वारस तपास, कुळ, फेरफार, खरेदी खते, बक्षीसपत्र, हक्क सोड पत्रक, ३२ ग, ३२म या अत्यंत महत्त्वाच्या नोंदी वेळेत होत नाहीत. यांचा शेतकरी, विद्यार्थी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशा बराच काळ प्रलंबित राहणाऱ्या प्रकरणांमुळे शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेताना अडचणी निर्माण होतात. त्यामुळे एकच तलाठी तीन गावाची सजा संभाळत असताना जी कसरत करावी लागते त्याचा रोष सर्व सामान्य शेतकरी तलाठ्यावर काढतात. अनेक वेळा तलाठी आणि शेतकरी यांच्यात नाहक खटके उडतात. यातून तलाठ्यांच्या तक्रारी वरीष्ठाकडे केल्या जातात. तलाठी आणि शेतकरी यांच्यातील हे वाद शमविण्यासाठी तेर्से बांबर्डे गावासाठी त्वरित स्वतंत्र तलाठी मिळावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने भास्कर परब यांनी केली आहे.