‘कवी युवराज सावंत यांच्या “घुसमट” कविता संग्रहाचे प्रकाशन’

तळेरे (प्रतिनिधी): ‘स्वातंत्र्यात आंम्ही कुठे?या बहुचर्चित आणि वाचकांनी प्रशंसा केलेल्या आणि भावलेल्या पहिल्या कविता संग्रहानंतर कवी युवराज सावंत यांच्या “घुसमट”या कविता संग्रहाचे प्रकाशन दिनांक १८जून२०२३रोजी शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे मा.आमदार ऋतुराज पाटील, मा.आमदार जयंत आसगावकर, मा.आमदार राजू आवळे,विद्रोही शाहीर संभाजी भगत,ज्येष्ठ साहित्यिक प्रा.टी.के.सरगर,प्रा.बाबुराव गुरव,कामगार नेते सुरेश केसरकर आदी मान्यवरांच्या हस्ते व उपस्थितीत समारंभपूर्वक होणार आहे. युवराज सावंत हे दोडामार्ग तालुक्यातील माध्यमिक विद्यालय मांगेली येथे विद्यादानाचे कार्य करतात.सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्यांनी काव्य लेखन छंद जोपासला असून ते साहित्य चळवळीत नेहमी सहभागी असतात. सभोवतालच्या अनागोंदी सापळ्यात अडकलेला सामान्य माणूस, त्याच्या रोजच्या आयुष्यात पाऊलागणिक होत असलेली त्याची घुसमट या वास्तवावर कवितेतून नेमकेपणे भाष्य केल्याचे त्यांनी सांगितले. ही घुसमट समाजातील प्रत्येक सजग माणसाची आहे. अविचारी माणसाची होणारी दिशाभूल आणि प्रत्त्येक विचारी माणसाची होणारी घुसमट याची उकल करण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येकाने ती घुसमट सजगतेने शोधावी, हा कविता संग्रह ही बहुचर्चित होईल हा आशावाद ही त्यांनी व्यक्त केला आहे. निर्मिती प्रकाशन कोल्हापूर यांनी हा कविता संग्रह वाचकांच्या भेटीस आणला आहे.

error: Content is protected !!