कुडाळ (अमोल गोसावी) : तुळसुली तर्फ माणगाव बुडक्याची वाडी (ता.कुडाळ) येथील दत्ताराम शंकर नाईक (वय 52) यांचे सर्प दंशाने उपचारादरम्यान गुरूवारी पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास जिल्हा रूग्णालय येथे निधन झाले. याबाबत कुडाळ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
बुधवारी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास नाईक यांच्या घरासमोरील अंगणात सरपटणारा प्राणी (साप) आला होता. त्याला कुत्र्यांनी अडवून ठेवले होते. त्या सापाला हाकलून लावण्याचा प्रयत्न दत्ताराम नाईक यांनी केला असता सापाने त्यांच्या उजव्या हाताला दंश केला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना गुरूवारी पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास निधन झाले. याबाबतची खबर त्यांचे भाऊ शशिकांत शंकर नाईक यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे, अशी माहीती पोलिस ठाण्यातून देण्यात आली.
सर्पदंशाने प्रौढाचा मृत्यू ; तुळसुली बुडक्याची वाडी येथील घटना












