दोघांना प्रत्येकी एक लाख रुपये दंड ठोठावला
दंड न भरल्यास अधिक एक वर्ष सश्रम कारावास
ओरोस (प्रतिनिधी): विनायक गणपत मुंडये (वय ६४), उत्तम गणपत मुंडये (वय ५८) दोन्ही राहणार पिंगुळी गोंधळपुर यांना महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी सात वर्षाचा सश्रम कारावास आणि दोघांना प्रत्येकी एक लाख रुपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास अधिक एक वर्ष सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. जिल्हा न्यायाधीश एस डी चव्हाण यांनी हा निकाल दिला असून सरकारी वकील नितीन कुंटे यांनी याप्रकरणी काम पाहिले. २९ मार्च २०१८ रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणी भादवी कलम ३५४(ब), ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी व पिडीत महिला यांच्यात जमिनीवरून वाद होते. आरोपी या वादांकित जमिनीतील नारळ काढत होते. यावेळी पिडीतीने कोण नारळ काढत आहेत ? असा प्रश्न केला असता. या दोन्ही आरोपीने तिचा विनयभंग करून मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. त्यामुळे त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक जी जी पाटील यांनी तपासी अधिकारी म्हणून काम पाहिले. न्यायालयाने एकूण सहा साक्षीदारांची साक्ष घेतली असून यातील फिर्यादीची साक्ष महत्त्वाची ठरली आहे. न्यायालयाने ३५४ अंतर्गत दोषी ठरवत पाच वर्षे सश्रम करावास तर ३५४ ब अन्वये सात वर्षे सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. ५०६ अंतर्गत निर्दोष मुक्तता केलेली आहे. तसेच दोन्ही आरोपींना प्रत्येकी एक लाख रुपये दंड ठोठावला असून हा दंड न भरल्यास अधिकचा एक वर्ष सश्रम कारावास सुनावला आहे.











