खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील खारेपाटण गुरववाडी येथे राहत असलेला नितीन सुभाष चव्हाण वय – ३८ या तरुणाचा मंगळवारी रात्री जंगलात शिकारीला गेलेला असताना बंदुकीची गोळी लागून मृत्यू झाला.याबाबत घातपात झाल्याचा संशय देखील व्यक्त केला जात आहे. याबाबत अधिक वृत्त असे की मयत नितीन चव्हाण याला शिकारीचा छंद होता.मंगळवारी रात्रीच्या सुमारास तो राजापूर तालुक्यातील पन्हाळे – शेजवली या गावाकडील जंगल भागात मोटार सायकलने शिकारीसाठी गेला होता. नळी असलेली बार भरलेली बंदूक पडू नये म्हणून त्यांनी गाडी चालवत असताना आपल्या शर्टच्या आत मध्ये छातिकडील पुढील भगात बंदूक खोउन ठेवली होती. मात्र शिकारीच्या नादात बंदुकीचा चाप अचानक घाई गडबडीत चुकीचा ओढला गेल्यामुळे किंवा गाडी वरून पडल्यामुळे चाप दाबला गेल्यामुळे बंदुकीची गोळी नितीन याच्या छातीला लागून यामध्ये तो गंभीर जखमी झाला.या अवस्थे मध्येच त्यांनी आपला मोठा भाऊ बाळू चव्हाण याला फोन करून आपल्याला गोळी लागल्याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच नितीन चव्हाण यांचे नातेवाईक जंगलाच्या दिशेने जात त्याला शोधून काढले.व जखमी अवस्थेतच त्याला खाजगी वाहनाने पुढील उपचारासाठी कणकवली येथे नेत असतानाच नितीन चव्हाण याचा वाटेतच मृत्यू झाला.
मात्र नितीन चव्हाण याच्या मृत्यू बाबत विविध प्रश्न उपस्थित होत असून घातपात झाल्याचा संशय देखील व्यक्त केला जात आहे.मयत नितीन चव्हाण सोबत शिकारीला जंगलात आणि कोणी गेले होते का ? तसेच त्याला गोळी चकुन लागली की स्वतःहून मारून घेतली?किंवा अन्य कुणाकडून त्याचा घातपात करण्यात आला.? हे सर्व प्रश्न इथे अनुत्तरित राहतात.याबाबत घटनेचा अधिक तपास खारेपाटण व कणकवली पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी करत असून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात शवविचेदन करून मृत देह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. दरम्यान नितीन चव्हाण याच्या मृत्यू ची बातमी खारेपाटण मध्ये समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याचा पचात पत्नी एक मुलगी आई आणि एक भाऊ असा परिवार आहे.
खारेपाटण येथे शिकारीला गेलेल्या तरुणाचा बंदुकीची गोळी लागून झाला मृत्यू…











