सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी लवकरच करणार जाहीर
मनसे सरचिटणीस संदीप दळवी यांची माहिती
कणकवली (प्रतिनिधी): राज्यात सुरू असलेला सत्तेचा खेळ पाहून जनतेच्या मनात प्रचंड चीड असून ही चीड व्यक्त करण्यासाठी मनसे राज्यभरात एक सही संतापाची मोहीम राबवणार असल्याची माहिती मनसे सरचिटणीस संदीप दळवी यांनी कणकवलीत आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज शी बोलताना दिली.मनसेच्या कणकवली तालुक्यातील सर्व माजी पदाधिकाऱ्यांची बैठक कणकवलीत हॉटेल जलतरंग येथे आयोजित करण्यात आली होती.या बैठकीला मनसे सरचिटणीस संदीप दळवी,मनसे कामगार सेना सरचिटणीस गजानन राणे यांनी मार्गदर्शन केले. राज्यात सुरू असलेल्या सध्याच्या राजकीय बाजाराबद्दल सर्वसामान्य जनतेच्या मनात प्रचंड राग आणि संताप आहे. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत 2024 साली हा राग जनता व्यक्त करेलच. पण त्याआधी जनतेच्या मनातील खदखद व्यक्त करण्यासाठी मनसे कडून एक सही संतापाची मोहीम संपूर्ण महाराष्ट्रात राबवणार आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी जाहीर केली जाईल असेही दळवी म्हणाले.यावेळी संतोष शिंगाडे, दया मेस्त्री, कुणाल किनळेकर, निलेश मेस्त्री, सौ दाभोळकर, शांताराम सादये, संतोष कुडाळकर, अनंत आचरेकर, समीर सावंत, राजा सावंत आदी उपस्थित होते.













