डाँ.जालिंदर अडसुळे सचिव, समता शिक्षण संस्था – पुणे यांचे प्रतिपादन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प धुळे व फर्स्टक्राय संस्था, पुणे यांच्याकडून पन्नास वृध्दांना किराणा वाटप
खारेपाटण (प्रतिनिधी) : समता शिक्षण संस्था, पुणे संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प, धुळे व फर्स्टक्राय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वास नगर, कुंडाणे व मोराणे या गावातील ५० आदिवासी, निराधार व गरजू वृध्दांना तीन महिने पुरेल इतके उच्च दर्ज्याचे किराणा साहित्य किट्सचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून समता शिक्षण संस्था पुणेचे सचिव मान.डाँ.जालिंदर अडसुळे यांनी त्यांच्या भाषणात बोलताना ,…..” कुटुंबातील वयोवृध्द नागरिक हे कुटुंबासाठी ओझे नसतात.त्यांची कुटुंबाच्या विकासात महत्वाची भूमिका आणि योगदान असते. कुटुंबात त्यांचा सन्मान व्हायलाच हवा.,” असे प्रतिपादन केले.
ग्रामीण व आदिवासी भागात विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांत गोरगरीब वृद्धांची फार दयनीय अवस्था असते हे ओळखून अशा परिस्थितीत या वृद्धांना आधार देण्यासाठी आणि त्यांच्या भुकेचा प्रश्न अंशतः का होईना सोडविण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून आधार प्रकल्पातील विश्वासनगर, कुंडाणे या आदिवासी वस्त्यांतील ५० वृध्दांना किराणा किट देण्यात आले. प्रा. उषा वाघ, अध्यक्ष, समता शिक्षण संस्था, पुणे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. फर्स्ट क्राय पुणे चे प्रतिनिधी किरण चिंदरकर, समता शिक्षण संस्थेच्या सदस्य अँड. प्रतिभा गवळी, समाजकार्य महाविद्यालयचे प्रभारी प्राचार्य डॉ. रघुनाथ महाजन हे यावेळी उपस्थित होते.
वृद्धांच्या स्थानिक खाण्याच्या सवयी व पोषण मूल्य लक्षात घेऊन त्यांना १० किलो बाजरी, ५ किलो गहू, ३ पॅकेट तेल, २ किलो शेंगदाणे, १ किलो मुग डाळ, १ किलो मटकी डाळ, १ किलो तूर डाळ, १ किलो चना डाळ, १ किलो काळी उडदाची डाळ, लाल मिरची पावडर ,हळद पावडर ह्या वस्तूंचे किट्स देण्यात आले.
आधार प्रकल्पाच्या माध्यमातून वृध्दांना आर्थिक, सामाजिक, वैदकीय आधार देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
या प्रसंगी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार’ प्राप्त आधार प्रकल्प लाभार्थी जयवंताबाई वाघ, सदस्य, ग्रामपंचायत, कुंडाणे यांचा प्रा.रचना अडसुळे, समन्वयक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प, धुळे यांचे हस्ते शाल + श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रा.रचना अडसुळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. कार्यक्रम अधिकारी सुनिता पाटील यांनी सूत्रसंचालन तर गणेश उफाडे यांनी आभार प्रदर्शन केले. सुभाष बागुल, रविंद्र कदम यांचे सहकार्य लाभले.















