उ.बा.ठा. वैभववाडी तालुका प्रमुख मंगेश लोके यांनी घेतला प्रसिद्ध पत्रकातून समाचार
वैभववाडी (प्रतिनिधी): तरेळे वैभववाडी गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गाची पूर्णपणे चाळण झाली आहे. जवळजवळ तीन-तीन फुट खोल व सहा-सहा मिटर लांबीचे भलेमोठो खड्डे या रस्त्यावर पडले आहेत. त्यामुळे या महामार्गावरून जाणा-या वाहन धारकांचे अतोनात हाल होत आहेत. या रस्त्यावर अनेक छोट्यामोठ्या अपघाताच्या दुर्घटना घडत आहेत. अशा या खोल खड्यांमुळे या वाहनधारकांचा बळी सुध्दा जाऊ शकतो. परंतु या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी एरव्ही सरकारी कर्मचा-यांवर चिखलफेक करणा-या या मतदारसंघातील स्टंट बहादुर आमदारांना लक्ष दयायला वेळ नाही. कारण सद्या हे आमदार मतदार संघापेक्षा राज्याच्या राजकारणात फक्त ठाकरे घराण्यावर टिका करण्यासाठीच त्यांना या मतदारसंघातील लोकांनी आमदार म्हणुन निवडून दिलेले आहे असे त्यांना वाटत आहे. परंतु ही सर्व प्रस्तिध्दी घेत असत|ना त्यांनी आपल्या मतदार संघाकडे सुध्दा आपुलकीने लक्ष देणे गरजेचे आहे. गेल्या तीन ते चार वर्षात तरेळे वैभववाडी गगनबावडा या रस्त्याची अत्यंत दयनिय अवस्था झालेली आहे. छोट्या मोठ्या वाहनधाकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. छोट्या रिक्षावाल्यांना तर आपली रिक्षा केव्हा पलटी होईल हे सुद्धा कळणार नाही अशी परिस्थिती झालेली आहे. पण नेहमी विकासकामाचे श्रेय घेणारे, त्याचप्रमाणे दरवर्षी घाटात जाऊन स्टंटबाजी करणारे या आमदारांनी सद्या या रस्त्याच्या दुरावस्थेकडे सुद्धा लक्ष द्यावे. या रस्त्याबद्दल व करूळ घाटातील दुरावस्थेबद्दल कुडाळ मालवणचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक हे अधिवेशनामध्ये बांधकाम मंत्र्यांना प्रश्न विचारतात व याची डागडुजी केंद्र सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर निधी उपलब्ध करावा असे सांगतात. परंतु या मतदारसंघातील स्थानिक आमदारांना मात्र या रस्त्याच्या दुरूस्तिबद्दल आवाज उठवायला वेळ नाही. त्याचप्रमाणे जिल्ह्याचे पालकमंत्री हे बांधकाम मंत्री असून त्यांनी सुध्दा या वैभववाडी तालुक्याकडे मंत्री झाल्यापासून पाठ फिरवलेली आहे. ते या तालुक्याचा प्रशासकीय दौरा का करीत नाहीत असा देखील सवाल येथील जनतेमधुन विचारला जात आहे. फक्त जिल्हा नियोजन बैठकीमध्ये या रस्त्याबद्दल विषय काढून सोपस्कार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याउलट या लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत यांनी मागील तीन वर्षापुर्वीपासून केंद्रीय रस्ते वहातुक मंत्री नितीनजी गडकरी यांचेकडे वेळोवेळी पाठपुरावा करून या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी मागणी केली आहे. त्यामुळेच श्री गडकरी साहेबांनी या रस्त्यासाठी केंद्राकडून निधी उपलब्ध करून दिला आहे. व सद्या याची निविद प्रक्रीया पूर्ण करणेत आलेली आहे. परंतु प्रशासनाच्या व ठेकेदाराच्या हलगर्जी पणामुळे या कामाला विलंब होत आहे. गेल्याच वर्षी झालेल्या करूळ घाट दुरूस्तीच्या कामासाठी सुमारे दोन कोटी रुपये खर्च करणेत आले आहेत. परंतु स्थानिक लोकप्रतिनिधींचा लक्ष नसल्यामुळेच हे काम पूर्णपणे निकृष्ठ दर्जाचे झालेले आहे. याचे उदाहरण सद्या लोकांना दिसत आहे. हा रस्ता पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा व आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कोल्हापुर-पुणे- मुंबईकडे ये- जा करणा-या लोकांसाठी व पर्यटकांसाठी खूप महत्त्वाचा असा रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरूस्ती होणे खूप गरजेची आहे. सद्या जे ठेकेदार या रस्त्याचे खड्डे भरत आहेत ते मुरूम व खडी टाकून भरले जात आहेत. परंतु या मुरूम व खडी टाकल्याने हे खड्डे आठ दिवस तरी टिकतील का अशी वहानधरकातुन शंका उपस्थित केली जात आहे. परंतु या राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने अशा प्रकारचे मुरूम व खडी टाकून दुरूस्ती न करता पावसाळी डांबर व जीएसबी वापरून हा रस्ता सुस्थितीत करावा अन्यथा शिवसेना उध्दव ठाकरे पक्ष या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी येत्या आठ दिवसामध्ये सर्व वाहनधारकांना घेऊन उग्र आंदोलन छेडेल.












