अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूलच्या मुलींनी गिरवले स्व संरक्षणाचे धडे
वैभववाडी (प्रतिनिधी): महिला व बाल विकास विभाग वैभववाडी यांच्या वतीने अर्जुन रावराणे विद्यालय व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय , जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल येथे राजमाता जिजाबाई युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम आज संपन्न झाला. बालविकास प्रकल्प अधिकारी वैभववाडी वैशाली काकडे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी डॉ.मनिषा नारकर यांनी उपस्थित मुलींना भारतीय स्त्री शक्ती याविषयावर मार्गदर्शन केले. मुलींचा पोषाख, व्यक्तीमत्व कसा असावा तसेच व्यसनाधीनता याबाबत विशेष मार्गदर्शन केले. तर सायबर क्राईम, सोशल मीडिया याबाबत पोलीस उपनिरीक्षक अमोल पाटील यांनी विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले. यावेळी एस टी स्टॅण्डवर दंगामस्ती करणाऱ्या युवकांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती या धाडसी कार्याबद्दल प्रशालेतील कु.सृष्टी रावराणे, कु.जागृती पांचाळ धाडसी विद्यार्थीनींचे पोलीस ठाण्याच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने तायकांदो राष्ट्रीय पंच हुमेरा मंसुरी व भावना ठाकूर यांनी प्रशालेतील मुलींना स्व संरक्षणाचे धडे दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रिडा शिक्षक संदेश तुळसणकर व आभार संदीप शिंदे यांनी व्यक्त केले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक बी.एस.नादकर, बालविकास प्रकल्प अधिकारी वैशाली काकडे, संरक्षण अधिकारी मिलन कांबळे, पोलिस उपनिरीक्षक अमोल पाटील, डॉ.मनिषा नारकर, विद्या गुरखे प्रशालेतील शिक्षक शिक्षिका व विद्यार्थीनी उपस्थित होत्या.













