दरड कोसळल्याने रस्ता बंद
पुर आपत्ती व्यवस्थापनातुन नडगिवे – कर्लेवाडी – पंचशील नगर मार्गे कोष्ट्येवाडी,खारेपाटण असा बनविण्यात आला होता रस्ता
खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावाला दरवर्षी पावसाळ्यात पुराचा फटका बसून गावातील सर्व रस्ते पाण्या खाली जाऊन वाहतूक बंद होऊन गावाचा संपर्क तुटतो.म्हणून गावाला पर्यायी रस्ता म्हणून नडगिवे – खारेपाटण कर्लेवाडी,पंचशील नगर मार्गे कोष्ट्येवाडी खारेपाटण हा रस्ता ३ महिन्यापूर्वी बनविण्यात आला होता.मात्र यंदाच्या पहिल्या पावसातच सदर रस्ता खचला असून रस्त्यावर दरड कोसल्याने वाहतुकीस बंद आहे.त्यामुळे रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे. सन २०२१ मध्ये खारेपाटण गावात शुक नदीला आलेल्या पुरामुळे खारेपाटण शहरात पुराचे पाणी घुसून व्यापारी वर्गाचे व नागरिकांचे नुकसान झाले होते.यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री नामदार उदय सामंत हे २७ जुलै २०२१ रोजी खारेपाटण येथे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता खारेपाटण येथे आले होते. यावेळी ग्रामस्थानी खारेपाटण गावाला पर्यायी रस्त्याची मागणी केली होती.ग्रामस्थांच्या या मागणीचा तातडीने विचार करून मंत्री उदय सामंत यांनी पूर आपत्ती व्यवस्थापनातुन या रस्त्यासाठी सुमारे ५० लाख रुपये मंजूर करून रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. पहिल्या पावसातच रस्त्याची दुरवस्था नडगिवे येथून सुरू झालेला खारेपाटण कर्लेवाडी – पंचशील नगर मार्गे कोष्ट्येवाडी हा रस्ता मार्च २०२३ मध्ये खडीकरण व डांबरीकरण करून बनविण्यात आला होता.परंतु घाई गडबडीने बनविन्यात आलेला हा रस्ता कर्लेवाडी घाटी च्या वर खिंडी बार येथे या पहिल्या पावसात खचला असून रस्त्याला मोठ्या उभ्या चर व भेगा पडल्या आहेत.तर भराव पूर्ण वाहून गेला असून रस्त्यावर दोन ठिकाणी दरड कोसळून मोठा दगड रस्त्यावर पडून रस्ता पूर्णतः हा वाहतुकीस बंद झाला आहे.तर रस्त्याचा भराव योग्य रीतीने न केल्याने तसेच रस्त्याला धोक्याच्या ठिकाणी संरक्षक भिंत न बांधल्यामुळे हा रस्ता खचला असल्याचे बोलले जाते. तर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण पूर्ण मंजूर झालेले असताना देखील काही ठिकाणी अर्धवट खडीकरण व डांबरीकरण करून रस्ता अर्धवट स्थितीत सोडून देण्यात आलेला आहे.
रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्यात यावी
खारेपाटण गावात पुरपरस्थिती निर्माण झाल्यास गावच्या नागरीकांदसाठी पर्यायी रस्ता म्हणून बनविण्यात आलेल्या रस्त्याची पहिल्याच पावसात ही अवस्था असेल तर या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकदराच्या कामाबाबत साशंकता व्यक्त केली जात असून या रस्त्याच्या संपूर्ण कामाची चौकशी करण्यात यावी अशी जोरदार मागणी आता ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.











