धामापूर तलावात मगरींचे वास्तव्य पुन्हा एकदा अधोरेखित
वनविभागाकडून खबरदारीचे आवाहन
चौके ( अमोल गोसावी ) : मालवण – कुडाळ मार्गावर काल सोमवारी रात्री सवा बारा वाजण्याच्या दरम्यान धामापूर तलाव , भगवती मंदिर परिसरातील पुलानजिक मुख्य रस्त्यावर एक सुमारे सहा ते आठ फूट लांबीची मोठी मगर फिरत असलेली मालवण येथील वाहन चालकांना दिसून आली. या परिसरातील मगरीच्या दर्शनामुळे धामापूर तलावातील मगरींचे वास्तव्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
रात्रौ रस्त्यावर मगर दिसताच वाहनचालकांनी त्यांचे मित्र व स्थानिक रहिवाशी ॲड. कन्हैया निवतकर यांना दूरध्वनीवरुन माहिती दिली. त्यानंतर आज सकाळी ॲड. निवतकर , सरपंच सौ. मानसी परब , उपसरपंच रमेश निवतकर यांनी वनविभागाचे वनपाल श्रीकृष्ण परीट यांना मगरीच्या संचाराबद्दल माहिती दिली. त्यानुसार आज दुपारी , वनरक्षक एस. एम. कांबळे , वनपाल राठोड यांनी धामापूर येथे येत मगर दिसलेल्या परीसराची पाहणी केली. यावेळी सरपंच सौ. मानसी परब , उपसरपंच रमेश निवतकर , प्रशांत गावडे , महेश परब हे सुध्दा उपस्थित होते .
यावेळी स्थानिक रहिवाशांनी धामापूर तलाव परीसरात फिरताना खबरदारी घ्यावी, तसेच तलावाच्या पाण्यात उतरू असे आवाहन वनरक्षक एस. एम. कांबळे यांनी केले आहे.











