ओरोस (प्रतिनिधी) : स्वच्छ सर्वेक्षण (ग्रामिण) 2023 अंतर्गत जिल्ह्यातील बापर्डे, परुळेबाजार, लोरे, कुंब्रल या चार ग्रामपंचायतीचे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी नामाकंण झाले आहे. याच्या मूल्यमापन साठी 1 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट २०२३ दरम्यान केंद्रस्तरीय समिती जिल्ह्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी दिली आहे.
स्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण) 2023 अंतर्गत जिल्ह्यातील 15 ग्रामपंचायतीची राज्यस्तराकरीता जिल्हास्तर तपासणी समितीच्या माध्यमातुन निवड करण्यात आली होती. निवड करण्यात आलेल्या 15 ग्रामपंचायतीची 5 जुलै ते 8 जुलै 2023 या कालावधीत राज्यस्तर तपासणी समितीच्या माध्यमातुन तपासणी पुर्ण करण्यात आली होती. स्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण) 2023 अंतर्गत राज्यस्तरावरुन निवड करण्यात आलेल्या राज्यातील 32 ग्रामपंचायतीमध्ये जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील बापर्डे, वेंगुर्ला तालुक्यातील परुळेबाजार, कणकवली तालुक्यातील लोरे, दोडामार्ग तालुक्यातील कुंब्रल या चार ग्राम पंचायतीची निवड केंद्रस्तर स्पर्धेकरीता झाली आहे. या ग्रामपंचायतीचे नामनिर्देश राज्यस्तरावरुन केंद्रस्तरावर पाठविण्यात आले आहेत.
राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या या ग्रामपंचायतीची 1 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान केंद्रस्तरीय समितीच्या माध्यमातुन तपासणी होणार आहे. तपासणीमध्ये वैयक्तिक शौचालय बाधकाम व वापर, सार्वजनिक शौचालय, सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन, शाळा, अंगणवाडी स्वच्छता, गावातील स्वच्छतेबाबत जाणीव जागृती याबाबत तपासणी करण्यात येणार आहे. अशी माहिती प्रजित नायर यांनी दिली आहे.











