खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ वरील खारेपाटण येथील विविध अपूर्ण असलेल्या कामांच्या बाबत आज गुरवारी सकाळी १०.०० वाजता ग्रामस्थानी एकत्र येत हायवे प्राधिकरणाचे अधिकारी मनोज पांडे व महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र.२ कार्यालयाचे अभियंता अतुल शिवणीवार यांना जाब विचारत अपूर्ण कामे कधी पूर्ण करणार ? असा सवाल केला.
यावेळी खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर,उपसरपंच महेंद्र गुरव,माजी सरपंच रमाकांत राऊत सामाजिक कार्यकर्ते मंगेश गुरव, सुहास राऊत,देवानंद ईसवलकर आदी प्रमुख पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
सद्या कोकणात मुसळधार पाऊस पडत असून शुक नदी दुथडी भरून वाहत आहे.असे असताना खारेपाटण येथे मुंबई – गोवा महामार्गावरील जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरून अजून वाहतूक सुरू असून नदीच्या पाण्याची पातळी वाढली असल्याने भविष्यात एखादी दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे.तर मुंबईच्या दिशेने येणारी वाहने खारेपाटण येथे महामार्गावर चुकीच्या दिशेने लेन मध्ये येत असून यामुळे देखील या ब्रिजवर अनेकदा अपघात झाले असून अजून अपघात होण्याची शक्यता आहे. दरम्यान नवीन ब्रीज खारेपाटण नदीवर बांधलेला असून त्याची एक लेन फक्त सुरू आहे.तर एक लेन भराव खचल्यामुळे बंद ठेवण्यात आली आहे. पर्याय म्हणून हायवे प्राधिकरणाच्या वतीने जुना पुल वाहतुकीस खुला केला असून त्यावरून सद्या अवजड वाहनांसह सर्वच लहान मोठी वाहने जात आहे.
खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने वारंवार संबधित अधिकारी यांना पत्रव्यवहार करून देखील व अधिकाऱ्यांच्या सदर बाब प्रत्यक्ष निदर्शनास आणून देखील या घटनेकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे.खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत यांनी हायवे प्राधिकरणाला खारेपाटण येथे नवीन बांधलेल्या पुलावरील भराव खचला असल्याने वाहतुकीस बंद करा.असे पत्र दिले होते.जोपर्यंत ब्रीज वरील काम पूर्ण करत नाही तोपर्यंत वाहतूक सुरू करू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला होता. परंतु अद्याप ही या कामाकडे दुर्लक्षच करण्यात आले असून पूर्वीचीच परस्थिती आजही कायम आहे.तसेच खारेपाटण येथील मुंबई – गोवा माहामार्गावरील सर्व्हिस रोड तसेच साईट गटारे तसेच बॉक्सवेल पुलावरील पोलची बंद असलेली लाईट आदी विविध प्रश्नांवर आज खारेपाटण ग्रामस्थानी एकत्र येत अधिकाऱ्यांना जाब विचारला.
यावेळी सार्व.बांधकाम विभाग कार्यालय खारेपाटण वर्ग -२ चे अभियंता तुल शिवणीवर, सहाय्यक अभियंता बी जी कुमावत हायवे प्राधिकरणाचे प्रोजेक्ट मॅनेजर अशोक पांड्ये खारेपाटण ग्रामविकास अधिकारी जी.सी. वेंगुर्लेकर आदी अधिकारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी वर्गाने खारेपाटण ब्रीज ची पाहणी केली.व वस्तुस्थिती जाणून घेतली मात्र खारेपाटण मधील अपूर्ण कमा बाबत लेखी पत्रव्यवहार रत्नागिरी येथील वरिष्ठ कार्यालयाला केला असल्याचे अभियंता अतुल शिवनीवार यांनी सांगितले.मात्र ग्रामस्थ आक्रमक झाले होते.जर खारेपाटण मधील अपूर्ण कामे पूर्ण केली नाहीत तर ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा खारेपाटण गावचे माजी सरपंच रमाकांत राऊत यांनी दिला.तर मुंबई – गोवा महामार्गावरील खारेपाटण येथील पुढील होणाऱ्या अपघातांना प्रशासन व हायवे प्राधिकरण जबाबदार असेल.असे देखील ग्रामस्थांच्या वतीने यावेळी सांगण्यात आले.











