भाजपा गटनेता विलास कुडाळकर यांचे लाभले सहकार्य
कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील स्मशानभूमीमध्ये राहणारे वृद्ध व्यक्ती पन्नालाल यांना नगरपंचायतीचे भाजप गटनेता विलास कुडाळकर यांच्या सहकार्याने पणदूर येथील सविता आश्रम येथे पाठविण्यात आले आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या पोलीस आणि आश्रमाच्या परवानगी घेण्यात आली आहे. यासाठी जीवन आनंद संस्थेचे संस्थापक संदीप परब यांचे सहकार्य लाभले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील सार्वजनिक स्मशानभूमीच्या शेडमध्ये वृद्ध व्यक्ती राहत होता त्या वृद्ध व्यक्तीला पन्नालाल या नावाने सर्वजण संबोधित होते. दोन दिवसापूर्वी आलेल्या पुरामध्ये ही व्यक्ती सापडली होती. या वृद्ध व्यक्तीला पोलीस यंत्रणा महसूल यंत्रणा व स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने पुराच्या पाण्याच्या बाहेर सुखरूप काढण्यात आले होते. दरम्यान स्थानिक नगरसेवक व भाजपा गटनेता विलास कुडाळकर यांनी जीवन आनंद संस्थेचे संस्थापक संदीप परब यांच्याशी संपर्क साधून या वृद्ध व्यक्तीची माहिती दिली. आज (शनिवारी) सविता आश्रममधील कर्मचारी महाबळेश्वर कामत व अक्सर हे कुडाळ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे या वृद्ध व्यक्तीला आश्रमात घेऊन जाण्यासाठी आले. त्यांच्या समवेत नगरसेवक विलास कुडाळकर होते. दरम्यान सविता आश्रमचे महाबळेश्वर कामत व अक्सर यांनी या वृद्ध व्यक्तीला रुग्णवाहिकेतून कुडाळ पोलीस ठाणे येथे येऊन गेले. पोलीस ठाणे येथे पत्र घेऊन या व्यक्तीला पणदूर येथील सविता आश्रममध्ये दाखल केले. यासाठी कुडाळ पोलीस ठाण्याचे संजय कदम महिला पोलीस परब व घाटकर यांचे सहकार्य लाभले.











