सत्ता ठाकरे शिवसेनेची…सेवा आ.नितेश राणेंची

विशेष संपादकीय

राजन चव्हाण ( सिंधुदुर्ग ) : देवगड जामसंडे नगरपंचायत कडून शहरवासीयांना होणारा पाणीपुरवठा भर पावसात मागील 6 दिवस बंद असताना नगरपंचायत मधील सत्ताधारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सिंधुदुर्गातील बडे बडे नेते तोंडाला भलीमोठी कुलूप लावून देवगडवासीयांकडे पाठ करतात. आणि त्याचवेळी भले नगरपंचायत वर सत्ता विरोधकांची असली तरी देवगड जामसंडे शहरातील जनता माझी आहे या भावनेतून देवगड कणकवली वैभववाडी चे भाजपा चे आमदार नितेश राणे हे देवगड जामसंडे नगरपंचायतमध्ये येऊन बंद असलेल्या पाणीपुरवठा या गंभीर विषयावर आढावा बैठक घेऊन राणे स्टाईल ने त्यावर लागलीच तोडगा देखील काढतात. या घटनेतून नगरपंचायतवर सत्ता कोणाची हे महत्वाचे नसून जनता माझी आहे, मतदार माझे आहेत या पालकत्वाच्या भावनेतून आमदार नितेश राणे यांनी देवगड जामसंडे शहरवासीयांना लागलीच पाणीपुरवठा कसा होईल याला प्राधान्य दिले, यातून आमदार नितेश राणे हे राजकारणापलीकडे जाऊन जनतेच्या समस्या मार्गी लावणे महत्वाचे मानतात हेच दिसून आले. देवगड – जामसंडेवासियांनी नगरपंचायत स्थापनेनंतर च्या पहिल्या निवडणूकीत आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्याकडे सत्ता दिली. त्यानंतर सुमारे दीड वर्षांपूर्वी झालेल्या नगरपंचायत च्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत सध्याच्या ठाकरे गटाकडे सत्तेची सूत्रे आली. थेट नगराध्यक्षपदी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या साक्षी प्रभू यांना निवडून देताना भाजपाच्या उमेदवाराला देवगड जामसंडे वासियांनी नाकारले. त्यानंतर दरम्यान च्या राज्यातील राजकीय घडामोडीनंतर देवगड जामसंडे नगरपंचायत कडे विकासाच्या दृष्टीने म्हणावा तसा लक्ष ठाकरे गटाच्या पुढाऱ्यांकडून अजिबातच दिला गेला नाही असेच म्हणावे लागेल. कारण 6 दिवस जर जनतेला प्यायला पाणी मिळत नसेल तर तळमळीने देवगडात जाऊन जनतेच्या प्यायच्या पाण्याची सोय करताना ठाकरे गटाकडून हालचाली दिसल्या असत्या. जे सत्ताधारी म्हणून त्यांचे कर्तव्यही आहे. जी लगबग आणि तत्परता देवगड जामसंडे नगरपंचायत ची सत्ता मिळेपर्यंत ठाकरे शिवसेना गटाकडून होत होती त्याचा लवलेशही मागील 6 दिवस ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी जनता टाहो फोडत असताना ठाकरे शिवसेनेकडून दिसून आला नाही. त्यायाउलट नगरपंचायत मधील विरोधी पक्षाचा आमदार असतानाही आमदार नितेश राणेंनी देवगड जामसंडेवासीयांसाठी अगदी तळमळीने नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा, नगरसेवक आणि प्रशासनाची तातडीने आढावा बैठक घेतली. केवळ बैठक घेतली नाही तर 6 दिवस बंद असलेल्या पाणी पुरवठ्याची मूळ कारणे शोधली. त्यावर तोडगा म्हणून देवगड जामसंडे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दहीबाव अन्नपूर्णा प्रादेशिक नळयोजनेच्या दुरीस्तीचा तातडीने प्रस्ताव तयार करणे, शिरगाव पाडघर रस्ता काम करताना नळपाणी योजनेचे फुटलेले पाईप आणि त्यामुळे झालेली अडचण दूर करण्यासाठी थेट जिल्हा परिषद सीईओं शि चर्चेतून केलेल्या सूचना, दहीबाव तळेबाजार लाईन योजनेसाठी सिंगल फिडर लाईन व या योजनेच्या दुरुस्तीसाठी 4 कोटी निधी च्या मागणीचा सविस्तर परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आणि तो मंत्रालयीन पातळीवर मंजूर करून घेण्याची दिलेली ग्वाही यातून जनतेप्रति आमदार नितेश राणे यांना असलेला कळवळा शनिवारी घेतलेल्या आढावा बैठकीत दिसून आला. भले नगरपंचायत निवडणुकीत विजयी आकड्यांच्या गणितात निसटत्या मतांनी भाजपाचा पराभव झाला असला तरीही देवगड जामसंडे वासीय जनता माझी आहे या भावनेतून नगरपंचायत मध्ये सत्ता नसतानाही आमदार नितेश राणेंनी जनतेसाठी घेतलेली धाव हे खऱ्या लोकप्रतिनिधीचे लक्षण आहे.

error: Content is protected !!