सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यात आजपासून महसूल सप्ताहाला प्रारंभ झाला असून सात दिवसांत नागरिकांना वारस तपास, प्रकल्पग्रस्त, कातकरी दाखले असे विविध प्रकारचे दाखले मिळण्यासाठी सर्कल स्तरावर कॅम्प आयोजित करून दाखले घरपोच केले जाणार आहेत. १८ वर्षांवरील एकही युवक मतदार नोंदणी पासून वंचित राहू नये, यासाठी कॉलेजमध्ये जावून कॅम्प द्वारे नोंदणी केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महसूल सप्ताह निमित्त जिल्हाधिकारी दालन सभागृहात मंजूलक्ष्मी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, महसूल नायब तहसीलदार विजय वरक, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना मंजूलक्ष्मी यांनी, आज महसूल दिन आहे. यावर्षी शासनाने महसूल सप्ताह साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार या सप्ताहाचा जिल्हास्तरीय शुभारंभ आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाला. यावेळी महसूल अधिकारी, कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.












