ब्युरो न्युज (मुंबई) : एकीकडे महाराष्ट्रात लवकरच देशपातळीवर तयार झालेल्या विरोधी पक्षाच्या फळीची बैठक पार पडणार आहे तर दुसरीकडे शरद पवार गटाला लागलेली गळती अद्याप सुरुच आहे. आता लवकरच शरद पवार गटातील एक बडा चेहरा अजित पवार गटाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे.
विधीमंडळ अधिवेशनाच्या काळात विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षात वसलेल्या जयंत पाटील यांना उद्देशून तुमचं आमच्याकडेच लक्ष नाही असा टोला मारला आणि राज्यात पुन्हा एकदा शरद पवार गटातील बडा नेता अजित पवार गटाला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या.
2 जुलै रोजी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि एक गट अजित पवार यांच्या नेतृत्वात सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला. यानंतर शरद पवार गटातून अजित पवार गटात जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच होती आता त्यात आणखी एका मोठ्या नेत्याची भर पडणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे सूत्रांच्या माहितीनुसार संबंधित नेत्याने अधिवेशन काळात भाजपचे राज्यातील वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली आणि आगामी काळातील घडामोडींबाबत चर्चा केली. लवकरच सदर नेता आगामी मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
राज्यात आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येत असून यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अमित शहा यांच्यासोबत आगामी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे. यामध्ये शिवसेना आणि भाजपमधील नेते तर असतीलच पण राष्ट्रवादीतील नेता देखील शपथ घेताना पाहायला मिळेल.












